मी जिवंत असेपर्यंत संविधान बदलू देणार नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
कर्नाटकमध्ये काँग्रेसने सत्ता मिळवताच एका रात्रीत मुस्लिम समाजाला ओबीसी असल्याचे घोषित केले. त्यामुळे कर्नाटकमध्ये 27 टक्के ओबीसी आरक्षणावर काँग्रेसने घाला घातला आहे. काँग्रेसला संपूर्ण देशामध्ये हेच करायचे असून, मी जिवंत असेपर्यंत धर्मावर आधारित आरक्षण देऊ देणार नाही अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी दिली. सातारा लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. देशाचे संविधान बदलण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेस पक्षांकडून केला जात आहे. मात्र काँग्रेसनेच संविधान बदलत कर्नाटकमध्ये ओबीसी समाजावर अन्याय केला आहे. काँग्रेसने 70 वर्ष सत्ता भोगली, मात्र जम्मू-काश्मीरमध्ये गोरगरिबांना आरक्षण मिळू दिले नाही. आम्ही 370 कलम हटवल्यानंतर तेथे गोरगरिबांना आरक्षण मिळाले असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या धोरणांवर जोरदार टीका केली. त्याचबरोबर विरोधक सोशल मीडियावर आमच्या नेत्यांचे, आपले आणि आमच्या मुख्यमंत्र्यांचे आवाज वापरून फेक व्हिडिओ टाकून संभ्रम निर्माण करत आहेत. त्यामुळे निवडणूक आयोगाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी करत अशा व्हिडिओची माहिती पोलिसांना देण्याचे आवाहन ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यात आधीही भगवा फडकत होता आणि यापुढेही तो फडकत राहील, असे सांगत लोकसभा निवडणुकीत खासदार उदयनराजे भोसले हेच विजयी होतील असा विश्वासही व्यक्त केला