ना.शंभूराज देसाई यांनी धरला छबिन्यात ठेका

मरळीत निनाईदेवीची यात्रा उत्साहात संपन्न मरळी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
मरळी ता. पाटण येथील ग्रामदेवता निनाईदेवीची यात्रा उत्साहात झाली. पालकमंत्री शंभूराज देसाई हे या यात्रेत सहकुटुंब सहभागी झाले. यावेळी निनाईदेवीचे त्यांनी मनोभावे दर्शन घेतले, तसेच निनाईदेवीच्या छबिना पालखी सोहळ्यात सेवा केली. शनिवारी झालेल्या या यात्रेत मंत्री शंभूराज देसाई व त्यांचे पुत्र यशराज देसाई यांनी मनसोक्तपणे गुलालाची उधळण करत ठेकाही धरला.

राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई हे रोखठोक आणि बिनधास्तपणाबद्दल ओळखले जातात. मरळी हे त्यांचे गाव आणि या गावच्या यात्रेत त्यांनी सहकुटुंब उपस्थिती लावली. गावातील त्यांच्या घरासमोर पालखी येताच देसाई यांनी सहकुटुंब ग्रामदेवता निनाई देवीचे दर्शन घेतले, तसेच गुलालाची उधळण केली. त्यानंतर ग्रामस्थांसमवेत पालखीसमोर जाऊन देसाईंनी गाण्यावर ठेका धरला. यावेळी लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष यशराज देसाई यांनीही गुलालाची उधळण केली. या सोहळ्यात ग्रामस्थांनीही देसाई यांना उचलून घेतलं, तसेच त्यांच्यासोबत गाण्यावरती ठेका धरला.