डाॅ.बाबासाहेब आंबेडकरच संपूर्ण समाजाचे दिशा दर्शक : अशोकराव थोरात


मलकापूर | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
 श्री मळाई देवी शिक्षण संस्था व मळाई ग्रुप,समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय,मलकापूर यांंचे संयुक्त विद्यमाने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती नुुतकतीच आदर्श ज्युनिअर कॉलेज मलकापूर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली.  

       कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.अशोकराव थोरात (शेती मित्र) आपले मत व्यक्त करताना म्हणाले की विचारांच्या माध्यमातून समाजाला पुढे नेले पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण समाजाला दिशा दाखवली अशा महामानवांचे कार्यक्रम घेऊन समाजासमोर आदर्श निर्माण करून द्यावा जेणेकरून त्या गोष्टींचे आचरण समाज करेल तसेच विद्यार्थ्यांचे जीवन बदलण्याची ताकद शिक्षण व्यवस्थेत आहे. शिक्षण व्यवस्थेने ही आपला आदर्श निर्माण करावा.असे आवाहन समाजातील सर्वच घटकांना केले.

        कार्यक्रमाच्या तरुण वक्त्या कु.रिद्धी टोळे पाटील म्हणाल्या,शिक्षण हे समाज परिवर्तनाचे साधन आहे. तसेच जातीयता नष्ट झाली तरच समाजामध्ये समानता येईल, कर्मकांडावर विश्वास न ठेवता शिक्षण व वस्तुस्थितीचे भान ठेवून यशस्वी जीवन जगले पाहिजे.युवा पिढी देशाचे आधारस्तंभ आहे, स्त्री ही व्यवस्थापनाची गुरु आहे, विचारांच्या बिया या मातीत रुजू द्यावेत, वैयक्तिक जीवनात विचारांचे अधिष्ठान असावे असे त्या म्हणाल्या.

कार्यक्रमाच्या पाहुण्या सौ सोनल भोसेकर (उद्योगिनी फाउंडेशन कराड) म्हणाल्या, प्रगल्भ समाज निर्माण होण्यासाठी विचार बदलले पाहिजेत, विचार बदलण्यासाठी पुस्तकांची गरज आहे . समृद्ध अशा ग्रंथालयांची गरज आहे शासन स्तरावर तसे प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्री शिकून आत्मनिर्भर बनली पाहिजे ती आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे असे मत व्यक्त केले

कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या गझलकार प्रा. संध्या पाटील यांंनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे जीवनावर आधारित विविध प्रसंग आपल्या भाषणातून व्यक्त केले तसेच डॉ.आंबेडकरांनी राज्यघटना लिहून संपूर्ण मानव जातील प्रगल्भ केले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,कर्मवीर भाऊराव पाटील ,शाहू महाराज यांनी शिक्षणाची गंगोत्री संपूर्ण तळागाळापर्यंत पोहोचवली त्याचबरोबर त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित व कुटुंबावर आधारित विविध गझल व कविता सादर केल्या .   

         विशांत थोरात,पांडुरंग जाधव (कवी ),वसंतराव चव्हाण ,भास्करराव पाटील,पांडुरंग पाटील ,रामराव पाटील,संजय तडाखे, सौ डॉ. स्वाती थोरात ,ग्रंथपाल वैशाली शेवाळे ,सौ नम्रता पाटील,समाज प्रबोधन वाचनालयाचे सर्व सदस्य,सर्व शाळांचे मुख्याध्यापक, श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. 

        प्रास्ताविकात प्रा. सौ सुरेखा खंडागळे यांनी समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय मलकापूर हे कराड तालुक्यातील संगणकीकृत, अद्यावत ज्ञान देणारे एक वेगळेपण जपणारे वाचनालय असून, विविध स्पर्धा परीक्षांची पुस्तके वाचनालयात उपलब्ध असून त्याचा वाचकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

           कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. सोपान जगताप यांनी केले तसेच उपस्थित मान्यवरांचे आभार श्री धनाजी भोसले यांनी मानले.