बनपुरी चा नाईकबा लाखो भाविकांचे श्रद्धास्थान...


प्रमोद पाटील|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान, पाटण तालुक्यातील बनपुरीचे जागृत देवस्थान श्री नाईकबा यात्रेस गुढीपाडव्यादिवशी प्रारंभ झाला असून आज शनिवारी दि. १३ रोजी नैवेद्य आणी रविवार दि. १४ रोजी पालखी सोहळा होणार आहे.

      त्यानिमित्त.. बनपुरीच्या दक्षिण डोंगरमाथ्यावर श्री नाईकबाचे पश्चिमाभिमुखी मंदिर हे भाविकांच्या देणगीच्या सहकार्यातून आकर्षक असे मंदिर आहे. श्री नाईकबा देवाच्या बाबतीत रहस्यमय आख्यायिका आहे. जानुगडेवाडीतील जानुगडे भावपणात तीन भाऊ व एक बहीण असे कुटुंब होते. त्या बहिणीचे नाव होते कृष्णामाई. ती गुरे चारण्यासाठी बनपुरी च्या डोंगरावर जात असे. गुरांच्या कळपातील काळ्या रंगाची कपीला नावाची कालवड तिची नजर चुकवून रोज एका मोठ्या दाट जाळीच्या आत जात असे. हे कृष्णामाईच्या ध्यानात आल्यानंतर तिचा पाठलाग करत ती धाडसाने त्या दाट झाडीमध्ये गेली. त्यावेळी ती काळी कपीला गाय एका मोठ्या शिलावर दुधाच्या धारा सोडत होती. त्यावेळी साक्षात श्री नाईकबा देवाने तिला दर्शन दिले. गुरे घेऊन ती घरी निघाली व एक छोटी टेकडी उतरून खाली आली. त्यावेळी तिला मोठा गडगडाट ऐकू आला. आवाज ऐकूण ती घाबरली व तिने मागे वळून पाहिले असता, ती शिला अंगावर येत असल्याचे दिसून आले. तिने घाबरत शिलेला हाताचा स्पर्श होताच ती शिला तेथे थांबली व दुभंगली गेली. त्या शिलेतून श्री नाईकबा स्वयंभू शिव पिंडीसारखी मूर्ती प्रकटली व तेजाने झळकू लागली, अशी आख्यायिका सांगितली जाते.

      चैत्र पाडव्यापासून येथील यात्रेला सुरूवात होते. चैत्र शुक्ल पंचमी, षष्टीला मोठी यात्रा भरते. गुढीपाडव्यावेळी कराडच्या काका शिंदे यांची मानाची सासनकाठी श्री नाईकबा देवस्थान ट्रस्टचे चेअरमन विलासराव जानुगडे पाटील यांच्या जानुगडेवाडी येथील घरी येते त्याठिकाणी जानुगडे कुटुंबांच्या वतीने सासनकाठीचे सनई वाद्याच्या गजरात स्वागत करून नैवेद्य दाखवून पूजन केले जाते नंतर ही मानाची काठी जानुगडेवाडी येथून श्री क्षेत्र बनपुरी येथील नाईकबा डोंगरावर प्रस्थान करते व त्यानंतर अनेक सासनकाठ्या श्री नाईकबा डोंगरावर येतात. यामध्ये कोल्हापूर, सांगली, कुरूंदवाड विभागातून आलेल्या सुमारे ४0 ते ५0 सासनकाठ्या व पालख्यांचा समावेश असतो. आज रविवार नैवेद्याचा दिवस असून रविवारी दि. १४ रोजी पहाटे पालखी सोहळा आहे. 'नाईकबाच्या नावानं चांगभलं'च्या गजरात हजारो भाविकांच्या उपस्थितीत सासनकाठ्यांसह श्री नाईकबाचा छबिना निघतो. यावेळी महाराष्ट्रासह कर्नाटकातील भाविकांची मोठी गर्दी होत असते.



       श्री नाईकबा देवस्थानचा शासनाने 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रामध्ये समाविष्ठ केले आहे. देवस्थानच्या विकासास प्रारंभ झाला आहे. याचाच भाग म्हणून भाविकांच्या सोईसाठी मंदिराच्या पाठीमागे भक्तनिवास बांधण्यात आले आहे. दुसऱ्या भक्तनिवासाचे काम पूर्ण झाले आहे.श्री नाईकबा यात्रा कालावधीमध्ये होणारी पिण्याच्या पाण्याची गैरसोय लक्षात घेवून बनपुरी ग्रामपंचायतीने भारत निर्माण योजनेतून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली आहे‌ श्री क्षेत्र नाईकबा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पिण्याचे पाणी भाविकांना मिळावे म्हणून बनपुरी गांवचे दानशूर व्यक्ती आणि युवा उद्योजक महेश पाटील यांनी आपल्या महेश पाटील इन्फ्राटेक कंपनीकडून गुढीपाडव्यापासून नाईकबा डोंगरावरती टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे यामुळे भाविकांना मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध झाले आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी यात्रेसाठी महिंद धरणातून वांग नदीत पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे भाविकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही. तीर्थक्षेत्र नाईकबा परिसरात पर्यटनास मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध झाल्या असून त्यासाठी बनपुरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांचा शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करत आहे. त्यामुळे शासनाकडून देवस्थानचा 'ब' वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश झाला असला तरी म्हणावा तितका निधी गेल्या सात,आठ वर्षांत उपलब्ध झालेला नाही. बनपुरी गावचे प्रसिद्ध बांधकाम व्यवसाय महेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली बनपुरी गावची ग्रामपंचायतीची सत्ता आहे त्यामुळे ते त्यांच्या कौशल्यावर नाईकबा परिसरामध्ये पर्यटनामधून जास्तीत जास्त निधी नाईकबा डोंगराच्या विकासासाठी शासनाकडून खेचून आणतील अशी अपेक्षा नाईकबा भाविकांना आहे यामुळे नाईकबा डोंगरावर विकासाची अपूर्ण असणारी कामे पूर्ण होतील. नाईकबा परिसरात विकास करण्यासाठी शासनाने ब वर्ग तीर्थक्षेत्रामधून निधी बनपुरी ग्रामपंचायतीस उपलब्ध करून देण्यात यावा अशी मागणी नाईकबा भाविकांच्या मधून होऊ लागली आहे, शासनाने निधी उपलब्ध करून देवस्थान परिसरात विकासाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावा. बनपुरी देवस्थान हे राज्यातील नावलौकिक असणाऱ्या देवस्थांनामध्ये गणले जाता असल्याने नाईकबा डोंगरावर पर्यटनासाठी मोठी संधी आहे असा विश्वास बनपुरी ग्रामस्थांसह भाविकांनी व्यक्त केला आहे.

______________________________

कुस्त्यांची परंपरा सुरु
पैलवान म्हटलं की, आठवते ती बनपुरी. मात्र गावातील कुस्त्यांची परंपरा खंडित झाली होती. ती युवा नेते अविनाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दहा वर्षापासून पुन्हा सुरू झाली आहे. यावर्षी शनिवारी दि. १३ रोजी दुपारी ४ वाजता होणाऱ्या कुस्ती मैदानात दिमाखदार आणि डोळ्यांचे पारणे फेडणाऱ्या चटकदार कुस्त्या पाहण्याची नामी संधी कुस्ती शौकिनांसह श्री नाईकबा भक्तांना मिळणार आहे. यावर्षी प्रथम क्रमांकाची २ लाख ५१ हजार रूपये इनामाची कुस्ती भारत केसरी पै.माऊली जमदाडे विरूद्ध २०२१चा हरियाणा केसरी पै. मनीज कुमार यांच्यात होणार आहे. ही कुस्ती युवा नेते अविनाश पाटील यांच्या तर्फे आयोजित करण्यात आली आहे नाईकबा केसरीसाठी पै ओमकार मोरे व पै धैर्यशील लोंढे यांच्यामध्ये रंगणार आहे. याचे सौजन्य सुरेश भाई कदम सरपंच सोनसळ यांचे आहे. तसेच शंभर रुपयापासून दोन लाखापर्यंतच्या चटकदार कुस्त्या कुस्ती शौकिनांना नाईकबा डोंगरावर पाहण्यास मिळणार आहे. यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी नाईकबा यात्रा कमिटी बनपुरी, ग्रामपंचायत बनपुरी, श्री नाईकबा देवस्थान ट्रस्ट, विकास सोसायटीचे पदाधिकारी, महेश पाटील इंन्फ्राटेक बनपुरी, आणि ग्रामस्थ प्रयत्नशील आहेत. या यात्रेसाठी महेश पाटील आणि कंपनी बनपुरीचे विशेष सहकार्य लाभले आहे.

______________________________