कार्यतत्परता पाटणचे प्रांताधिकारी, तहसीलदार यांची


 परीक्षार्थीला दिले एका आठवड्यात सर्व शासकीय दाखले. पाटणच्या जनतेकडून महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक.                                           
तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
 एखाद्या कामासाठी शासकीय दाखले काढणे किती मुश्किल असते याची जाणीव सर्वांना आहे  मात्र पाटणचे प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी एका परीक्षार्थीला एका आठवड्याच्या आत सर्व शासकीय दाखले तातडीने देऊन एक नवा विक्रम व इतर तालुक्यातील महसूल प्रशासनासाठी एक आदर्श घालून दिला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून  पाटणच्या या महसूल अधिकाऱ्यांचे कौतुक होत आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की मल्हारपेठ तालुका पाटण येथील रहिवासी स्वाती उत्तम कदम सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत.नुकतेच त्यांनी तलाठी परीक्षेतही  यश संपादन केले आहे.

 त्या MPSC व UPSC या स्पर्धा परीक्षेची देखील तयारी करत आहेत त्यासाठी वेगवेगळे दाखले आवश्यक असल्याबाबत त्यांनी महसूल प्रशासनात सांगितले या गोष्टीची तातडीने दखल घेऊन आपण अभ्यासाची तयारी सुरू ठेवावी दाखले देण्यासाठी सेतू व प्रांत कार्यालय सर्वोतोपरी सहकार्य करेल असे आश्वासन महसूल प्रशासकडून देण्यात आले त्यानुसार प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी सर्व संबंधितांना स्वाती कदम यांना लागणारे दाखले तत्परतेने देण्या बाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या  

त्यानंतर केवळ एका आठवड्यात कुणबी दाखला,उत्पन्न दाखला, नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र व केंद्र शासनाच्या नमुन्यातील OBC चे प्रमाणपत्र देखील UPSC चा फॉर्म भरण्यासाठी काही मिनिटे शिल्लक असताना देण्यात आला.

वरील प्रमाणे सर्वच दाखले एका आठवड्याच्या आत मुदतीत मिळाल्याने स्वाती कदम यांनी मनापासून महसूल प्रशासनाचे आभार व्यक्त केले.विविध स्पर्धा परीक्षा देताना वेगवेगळी आव्हाने असतात फॉर्म भरण्यासाठी वेगवेगळे दाखले देखील काढावे लागतात ते दाखले काढण्यासाठी बऱ्याचदा तरुणांना कागद पत्राची जुळवाजुळव करावी लागत असते.दाखला मुदतीत मिळाला नाही तर परीक्षेसाठी बसण्याची संधी तर हुकणार नाही ना?अशी देखील चिंता त्यांना सतावत असते. मात्र पाटण तालुका याला अपवाद ठरला आहे.येथील सेतू कार्यालय तहसील कार्यालय ,तसेच प्रांत कार्यालय यांनी स्वाती कदम याना तत्परतेने दाखले देण्यासाठी खूप सहकार्य केले त्यामुळे प्रांताधिकारी सुनील गाढे ,तहसीलदार अनंत गुरव व सेतू कर्मचारी सतेज गायकवाड यांचे विषयी सदर तरुणीने कृतज्ञता व्यक्त केली आहे. 

दरम्यान कोणत्याही विद्यार्थ्यांचे शैक्षणिक अथवा नोकरीचे नुकसान होऊ नये म्हणून दाखले देताना सर्व महा ई सेवा केंद्र तसेच सेतू संचालक यांनी तत्परतेने व नियमानुसार कार्यवाही करण्याच्या सूचना प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी दिल्या आहेत.