तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील ढेबेवाडी पासून सुमारे 30 किलोमीटर उंच डोंगराच्या पठारावरील श्री क्षेत्र वाल्मिक मंदिराच्या ठिकाणाला अध्यात्मिक महत्व आहे तसेच हे ठिकाण निसर्गरम्य असून वाल्मिक ठिकाणा पासून पुढे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प सुरु होतो याच श्री क्षेत्र वाल्मिकी ची यात्रा दरवर्षी भरते या यात्रे दरम्यान दूरवरून भाविकांच्या पायी दिंड्या दाखल होत असतात. या वर्षी श्री वाल्मीकी देवस्थान ट्रस्ट, पाणेरी ग्रामपंचायत व ग्रामस्थांकडून यात्रेच्या नियोजनाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. बुधवार दिनांक ०६ मार्च ते ०८ मार्च या तीन दिवशी एकादशी ते महाशिवरात्री पर्यंत वाल्मिक पठारावर राम नाम जप, किर्तन, भजन, भारूड याचे आयोजन केले आहे. ०६ मार्च रोजी दिवस रात्र रामनाम जप, गुरुवारी दिनांक ०७ रोजी पालखी मिरवणूक, आरती, दहीकाला दहीहंडी असे कार्यक्रम होतील.
शुक्रवारी दिनांक ८ यात्रेचा मुख्य दिवस आहे. या दिवशी भाविक भक्तांना दर्शन मंदिर परिसरात किर्तन, भारूड, भजन याचे मौजे पाणेरी श्री क्षेत्र वाल्मिक देवस्थान ट्रस्टच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी
भाविकांचा दिवसभर ओघ असतो. भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी पार्किंग, पाणीपुरवठा, विज, आरोग्य आदींची व्यवस्था करण्यात आली आहे असे श्री वाल्मीकी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश पवार, पाणेरी ग्रामपंचायतीचे सरपंच शिवाजी पवार यांनी सांगितले.