ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा: निर्मलग्राम मान्याचीवाडी तालुका पाटण गावचे सुपुत्र ,सातारा जिल्हा परिषदचे माजी अर्थ, शिक्षण व क्रिडा सभापती, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत शारीरिक शिक्षण विभागाचे एक उत्तम आणि प्रख्यात प्रा.उत्तम ऊर्फ यू. टी.माने यांचे काल शनिवार दिनांक ९ मार्च २०२४ रोजी पहाटे त्यांच्याच जन्मगावी मान्याचीवाडी येथे वयाच्या अंदाजे 75 व्या वर्षी हृदय विकारांच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
प्रा.यू. टी.माने सरांचा जन्म मान्याचीवाडी तालुका पाटण येथील शेतकरी कुटुंबात झाला. प्रतिकूल परिस्थितीही त्यांनी पदवी प्राप्त केली 33 वर्षांहून अधिक काळ त्यांनी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत विविध ठिकाणी शारीरिक शिक्षण विभागात अध्यापनाचे काम केले. आपल्या कार्यकाळात त्यांनी जिल्हा, राज्य आणि देश पातळीवर खेळण्यासाठी अनेक कबड्डी, खो खो सारख्या विविध खेळात नामवंत खेळाडू तयार केले. अध्यापनाचे काम करत असताना माजी मंत्री स्वर्गीय विलासराव पाटील यांचे आशीर्वादाने त्यांना जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून येवून काम करण्याची संधी मिळाली त्यांनी मिळालेल्या संधीचे सोनेही केले त्यांचे कार्यकर्तृत्वाने त्यांना सातारा जिल्हा परिषदेच्या शिक्षण, अर्थ आणि क्रिडा समिती चे सभापती म्हणुन काम करण्याची संधी मिळाली त्यांनी या आपल्या कार्यकाळात शिक्षण, क्रिडा आणि अर्थ क्षेत्रात जिल्हा पातळीवर अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले, विद्यार्थ्यांचे क्रिडागुणां प्रोत्साहन मिळावे म्हणून क्रिडा विषयक निर्णय घेतले, शिक्षण विभागात त्यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले अर्थखाते सांभाळताना सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न करून त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले.
सेवानिवृत्ती नंतर त्याच्या खिलाडूवृत्तीमुळे त्यांनी क्रिडा क्षेत्रात आपले काम चालूच ठेवले ते सातारा जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनचे कार्यकारिणी सदस्य म्हणुनही काम पहात होते, अजूनही त्यांचे नेतृत्वाखाली मुलां -मुलींचे जिल्हा, राज्य पातळीवर निवडीचे कबड्डीचे सामने व्हायचे त्यामुळे तरुणांमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. त्यांचा जिल्ह्यातील नव्हे तर राज्यातील अनेक क्रिडा संघटनांशी जवळचे सबंध होते.
गावातील प्रत्येक कुटुंबातील सुख दुःखात ते नेहमी सहभागी होत असत. माने सर हे मनाने दिलदार होते,प्रेमळ स्वाभावी होते त्याचबरोबर ते कुटुंबवत्सलही होते.
अशा या समाजप्रिय प्रा.यू टी.माने सरांचे काल दुःखद निधन झाले त्यांच्या पाठीमागे त्यांची पत्नी, मुले- मुली नातवंड असा मोठा परिवार आहे.
रक्षाविसर्जन विधी उद्या सोमवार दिनांक ११/०३/२४ रोजी वैकुंठधाम माहुली सातारा येथे सकाळी ९:३० वाजता होईल.