नवी दिल्ली | कृष्णाकाठ वृत्तसेवा: संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा अखेर जाहीर झाल्या आहेत. देशात एकूण सात टप्प्यात मतदान होणार आहे. 19 एप्रिलला पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. तर शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी मतमोजणी होणार असून त्याच दिवशी निकाल लागणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने ही माहिती दिली. निवडणूक आयोगाच्या या घोषणेनंतर देशभरात आजपासूनच आचार संहिता लागू झाली आहे. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर आता राजकीय पक्षांच्या जोर बैठकांना अधिकच जोर येणार आहे. राजकीय समीकरणांचीही जुळवाजुळव जोरात होणार आहे. त्रिसदस्यीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. कोणत्या राज्यात किती टप्प्यात मतदान होईल, निकाल कधी लागेल, देशातील एकूण मतदार किती? स्त्री आणि पुरुष मतदार किती? नव मतदार किती? संवेदनशील मतदारसंघ किती? या सर्वांची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी आम्ही तयार आहोत, असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितलं. सात टप्प्यात मतदान पहिला टप्पा – 19 एप्रिल दुसरा टप्पा – 26 एप्रिल तिसरा टप्पा – 7 मे चौथा टप्पा – 13 मे पाचवा टप्पा – 20 मे सहावा टप्पा – 25 मे सातवा टप्पा – 1 जून देशात 97 कोटी मतदार आपल्या देशात 97.8 कोटीहून अधिक मतदार आहेत. त्यात 49.7 कोटी पुरुष आणि 47.1 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. तसेच 1.82 कोटी नवीन मतदार आहेत. यंदा 82 लाख प्रौढ मतदार मतदान करणार आहेत. 48 हजार तृतीयपंथीयही मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.
महाराष्ट्रातील निवडणुकांचे टप्पे, मतदानाची तारीख व जिल्हे
पहिला टप्पा (५ मतदारसंघ) 19 एप्रिल 2024 गडचिरोली, भंडारा-गोंदिया, नागपूर, चंद्रपूर, रामटेक (एकूण ५)
दुसरा टप्पा (८ मतदारसंघ) 26 एप्रिल 2024 बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी (८)
तिसरा टप्पा (११ मतदारसंघ) 7 मे 2024 रायगड, बारामती, उस्मानाबाद, सोलापूर, लातूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले (एकूण ११)
चौथा टप्पा (११ मतदारसंघ) 13 मे 2024 अहमदनगर, शिर्डी, बीड, नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छ. संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर (एकूण ११)
पाचवा टप्पा (१३ मतदारसंघ) 20 मे 2024 धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई (६ मतदारसंघ) (एकूण १३)
महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यात निवडणूक होणार असल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली आहे. महाराष्ट्रात 26 एप्रिलपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. यानंतर 7, 13, 20, 25 मे रोजी उर्वरित चार टप्प्यातील मतदान होणार आहे. तसंच 26 विधानसभा जागांवर पोटनिवडणूक होणार असून यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. महाराष्ट्रातील एका जागेवर पोटनिवडणूक होणार आहे
______________________________