तारळे|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
गुलाल खोबऱ्याची उधळण करत जोतिबाच्या नावानं चांगभल, नवलाई देवीच्या नावानं चांगभल च्या जयघोषात श्री क्षेत्र जळव ता पाटण येथील श्री जोतिबा देवाची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात रविवार दिनांक 25 व सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी 2024 रोजी पार पडली.
उंच डोंगर माथ्यावर श्री क्षेत्र जळव हे गांव वसले असून ग्रामदैवत जोतिबा देवाची यात्रा गुरुप्रतिपदा या दिवशी भरते तारळे नंतर या विभागातील मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. जिल्हाभरातून मानाच्या सासनकाठ्या येथे येतात दर पौर्णिमा, अमावस्येला श्री जोतिबाच्या दर्शनाला भाविकांची वर्दळ असते. रविवारी जोतिबाची बहीण असणारी तारळे येथील नवलाई देवीची पालखी तारळे ते जळवला जाणाऱ्या घाटातून पायी प्रवास करून सायंकाळी प्रमुख मानकऱ्यांसह वाजत गाजत श्री क्षेत्र जळवच्या वेशीवर पोहचते या दरम्यान जिल्हाभरातील सासनकाठ्या वेशीवर पोहचल्यावर ग्रामस्थ यांचे वतीने मानपान करून त्यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी श्री जोतिबाच्या व नवलाईच्या नावानं चांगभलंच्या गजराने डोंगर दणाणून गेला याठिकाणी पालखी, सासन काठ्या चा मुक्काम झाला रात्री छबिना पार पडला सोमवारी यात्रेचा मुख्य दिवस या दिवशी भाविक भक्त यांनी श्री जोतिबाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली होती या डोंगरावरील श्री क्षेत्र जळव येथील श्री जोतिबाच्या दर्शना साठी तारळे, पाटण ठिकाणाहून दुचाकी, चारचाकी यासह एसटी ने भाविक मोठ्या संख्येने आले होते. यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडल्यावर दुपारी मुख्य छबिन्याला सुरुवात झाली प्रथम जोतिबाचे मानकरी,ग्रामस्थ नवलाईच्या भेटीसाठी नवलाई माळावर वाजत गाजत दाखल झाले यानंतर नवलाई देवीची पालखी, सासनकाठ्या वाजत गाजत मंदिराकडे गेल्या यावेळी भाविक भक्त यांनी गुलालाची उधळण करून जोतिबाच्या, नवलाईच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने जळव नगरी दुमदुमली.
यावेळी पाटण तालुक्यासह जिल्हाभरातील हजारो भाविक भक्त यांनी देवाच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती या यात्रे दरम्यान कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र मुरुडचे पथक तळ ठोकून होते.
या यात्रेसाठी तारळे पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्वेता पाटील, कराड येथील PSI कांबळे, कराड शहर वाहतूक PSI अनिल पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता यात्रा शांततेत पार पडली. यात्रा कमिटीने येणाऱ्या भाविकांची सर्व व्यवस्था चोखपणे केली होती यात्रेकरूंना, भाविकांना कोणतीही अडचण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली होती. यात्रा उत्साहात संपन्न झाली.