कृषी अधिकाऱ्यांनी केलेल्या सन्मानाने डाॅ.संदीप डाकवे भारावले


तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

शासकीय योजना लोकांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कृषी अधिकारी वेळोवेळी शेताच्या बांधावर जातात. कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळाल्याबद्दल थेट विजेत्यांजवळ जावून आपुलकीने सत्कार करणारे अधिकारी मात्र विरळच. असाच प्रसंग नुकताच घडला. कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी रियाज मुल्ला, मंडळ कृषी अधिकारी सुनील ताकटे, पाटण तालुका कृषी अधिकारी कुंडलिक माळवे, कृषी सहायक ए.बी.पवार व जी.डी.सावंत या अधिकाऱ्यांनी पाटण तालुक्यातील पुरस्कार विजेत्यांचा घरी जावून शाल, श्रीफळ आणि बुके देवून यथोचित सन्मान केला. या सन्मानाने सर्व पुरस्कार विजेते भारावून गेले. यथावकाश शासनाच्या मार्फत दैदिप्यमान सोहळयात विजेत्यांचा सन्मान होईलच परंतू आपुलकीने नाती जोडण्यासाठी अशा प्रकारच्या उपक्रमाचे आयोजन केल्याचे कृषी अधिकारी वर्गांनी सांगितले.

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील पत्रकार डाॅ.संदीप डाकवे यांना महाराष्ट्र राज्य शासनाच्या कृषी विभागाचा पत्रकारितेचा सर्वोच्च वसंतराव नाईक शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कृषी अधिकाऱ्यांनी त्यांचा सन्मान केला. या आपुलकीच्या सन्मानाने डाॅ.डाकवे भारावून गेले. पुरस्काराचे स्वरुप रुपये 1 लाख 20 हजार, मानपत्र, मानचिन्ह व रु.15 हजार प्रवास भत्ता असे आहे.

शेतीमित्र पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल डाॅ.संदीप डाकवे या युवा पत्रकाराचे आणि त्यांच्या लेखणीचे कौतुक करण्यासाठी अधिकारी थेट त्यांच्यापर्यंत पोहोचले. सत्कार करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत भविष्यातही कृषी विभागाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. ‘‘आपल्या या आपुलकीच्या आणि मायेच्या सन्मानामुळे मला यापुढे कृषी क्षेत्रात पत्रकारिता करण्यास आणखी उर्जा आणि बळ मिळेल तसेच माझी जबाबदारीही वाढली आहे’’ अशी भावना याप्रसंगी डाॅ. संदीप डाकवे यांनी व्यक्त केली.

 डाॅ.संदीप डाकवे यांनी कृषाीविषयक बातम्या, शेतकरी यशोगाथा, कृषी योजना प्रसारासाठी स्वतःची प्रकाशने आणि सोशल मिडीयाचा प्रभावी वापर केला आहे. तसेच स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट च्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवलेले आहेत. या आगळयावेगळया सन्मानाने पत्रकार डाॅ.संदीप डाकवे भारावले आहेत.

दरम्यान, यापूर्वी खा.राहुल शेवाळे, अभिनेते दिगंबर नाईक, मुख्यमंत्री सहायता निधी कक्षप्रमुख मंगेश चिवटे, भिमराव धुळप याही मान्यवरांनी डाॅ.डाकवे यांचा सन्मान देवून गौरव केला आहे.