सहकार क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल दमणमध्ये 'जनसहकार'चा' बँको ब्ल्यू रिबनने गौरव



ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

तळमावले ता. पाटण येथील जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेला बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने दमण येथे सन्मानित करण्यात आले. 

सहकार क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या संस्था व बँकांना बँको ब्ल्यू रिबन पुरस्काराने गौरविण्यात येते. वांग खोऱ्यातील सुपुत्र मारुतीराव मोळावडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्थापन केलेल्या जनसहकार समूहातील जनसहकार नागरी सहकारी पतसंस्था आणि जनसहकार निधी लिमिटेड या संस्था प्रगतीकडे वाटचाल करत असून, सर्वसामान्य माणूस, लहान मोठे उद्योजक, व्यापारी, सुशिक्षित बेरोजगार यांना आर्थिक पाठबळ देत स्वबळावर उभे करण्याचे काम संस्थेमार्फत सुरू आहे. यातील जनसहकार नागरी सहकारी पतसंस्थेकडे ३० कोटी ९१ लाख रुपयांच्या ठेवी असून, १५ कोटी २५ लाख रुपयाचे कर्जवितरण करण्यात आले आहे. संस्थेला ५४ लाख ७५ हजारांचा नफा झाला आहे. सातारा, सांगली, पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या संस्थेचे तळमावले येथे मुख्यालय असून, तळमावले, कऱ्हाड व नवी मुंबईत शाखाविस्तार झाला आहे. लवकरच कामोठे येथेही शाखासुरू होणार आहे. दमण येथे आयोजित कार्यक्रमात माजी सहकार आयुक्त मधुकरराव चौधरी, अशोक नाईक, अविनाश शिंत्रे यांच्या हस्ते बँको ब्लू रिबन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. संस्थापक अध्यक्ष मारुतीराव मोळावडे, उपाध्यक्ष अमोल मोरे, विवेक मोळावडे, प्रदीप मोळावडे, महेश घागरे, आधिक मोळावडे आदी उपस्थित होते. मारुती मोळावडे म्हणाले, "पारदर्शक व विश्वासार्ह कारभार करत संस्थेने जनमाणसात विश्वासाचे स्थान मिळविले आहे. संस्थेचा आज झालेला गौरव ही विश्वासार्हतेची पोच असून, पुढच्या प्रगतिकारक वाटचालीला त्यातून निश्चित बळ मिळेल."