नूतन स.पो.नि. शैलजा पाटील यांनी स्वीकारला ढेबेवाडी पोलीस स्टेशनचा कार्यभार.


ढेबेवाडी|कृष्णाकाठ वृत्तसेवा: ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांची बदली होऊन त्यांच्या जागी सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांनी नुकताच कार्यभार स्वीकारला आहे. ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले. ढेबेवाडी पोलीस स्टेशनला पहिल्यांदाच महिला अधिकारी मिळाल्या आहेत. दुर्गम गावे, वाड्यावस्त्या, विस्तृत कार्यक्षेत्र, अपुरे पोलीस कर्मचारी या स्थितीत त्यांच्यापुढे कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान असणार आहे.

ढेबेवाडी पोलीस स्टेशनमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पदभार स्वीकारलेल्या शैलजा पाटील पहिल्याच महिला पोलीस अधिकारी आहेत. 

 या पूर्वी महाड (रायगड), ठाणे शहर, पन्हाळा शाहूवाडी, कोल्हापूर, कराड आदी पोलीस ठाण्यात त्यांनी सेवा बजावलेली आहे. ढेबेवाडी विभाग हा तळभागाबरोबरच दुर्गम डोंगराळ विस्तृत असा विभाग आहे. ६३ ग्रामपंचायती, १५० पेक्षा अधिक महसुली गावे, अनेक वाड्यावस्त्या असा विस्तृत कार्यक्षेत्र असलेला विभाग असून ढेबेवाडी पोलीस स्टेशनची अपूरी कर्मचारी संख्या अशा अनेक अडचणीतून त्यांना विभागामध्ये कायदा सुव्यवस्था राखावी लागणार आहे. त्याचबरोबर अवैध धंद्यांना आळा घालावा लागणार आहे तसेच जरब निर्माण करून कायद्याचा धाक निर्माण करावा लागणार आहे. गेल्या काही वर्षभरातील घटना लक्षात घेता तत्कालीन पोलीस अधिकाऱ्यांनी ढेबेवाडी विभागात कायदा व सुव्यवस्था राखण्यात चांगले यश मिळवले आहे. मात्र सध्याच्या नवीन पदभार स्वीकारलेल्या स.पो.नि. शैलजा पाटील यांच्यापुढेही कायदा व सुव्यवस्थेचे मोठे आव्हान असणार आहे.

नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलजा पाटील यांनी ढेबेवाडी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारल्यानंतर ढेबेवाडी पोलीस कर्मचाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये त्यांचे स्वागत केले. त्यावेळी पोलीस कर्मचारी विकास सपकाळ, प्रशांत चव्हाण, माणिक पाटील, अशोक निकम, प्रशांत माने, संजय थोरात, अश्विनी माने, प्रियांका सुर्वे, पोलीस पाटील विजय लोहार, भगवान मत्रे आदींची उपस्थिती होती. त्याचबरोबर समाजातील विविध पदाधिकाऱ्यांनीही त्यांचे स्वागत केले.