कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
गेल्या पंधरा ते वीस वर्षात महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र सर्व अर्थाने मागे पडत चालले असून अधोगतीकडे चालले आहे. सहकार क्षेत्रामध्ये होणारी ही घसरण रोखण्याचा प्रयत्न गतवर्षी मळाई ग्रुप व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र विचार मंच यांचे संयुक्त विद्यमाने संबंध दिवसांसाठी दि.19 /11/2023 रोजी एक सहकार परिषद आयोजित केली होती.सदर परिषदेस सहकार क्षेत्रातील तरुणांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला यामुळे तरुणांच्यामध्ये गेलेला सकारात्मक संदेश विचारात घेऊन पश्चिम महाराष्ट्रातील दुसरी सहकार परिषद दिनांक. 29/01/2024 रोजी कराड येथे अर्बन बँकेच्या शताब्दी सभागृहात आयोजित केलेली आहे.
सहकार परिषद :
भारतातील ग्रामीण भागाचा व शेती क्षेत्राचा विकास करण्याच्या उद्देशाने सन 1904 मध्ये ब्रिटीशांनी केलेल्या सहकार कायद्याच्या माध्यमातून सहकार चळवळ सुरु झाली. महाराष्ट्रात तर १९६० च्या सहकार कायद्यामुळे शेती, उद्योग, रोजगार क्षेत्राच्या वाढीस व विकासास चालना मिळाली व ग्रामीण व शहरी भागाचा विकास झाला.हे मान्य असले तरी स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरच्या काळात या चळवळीचा सर्वत्र पुरेसा सारखा विकास होऊ शकला नाही. लोकशाही कारभाराचे तत्व असणारा सहकार जगातील सर्वात मोठी लोकशाही असणाऱ्या देशात पुरेसा रुजला नाही. भांडवलशाहीतील शोषण पिळवणूकीच्या विरोधात उभी राहिलेली ही चळवळ १९९१ च्या नवीन आर्थिक धोरणातील खाजगीकरणामुळे गिळंकृत करायला सुरुवात केली आहे. सहकारात घुसखोरी केलेल्या राजकारण, घराणेशाही व स्वार्थी वृत्तीने सहकाराचे लचके तोडण्यास सुरुवात केली आहे.अशा सहकार क्षेत्राची वास्तव वस्तुस्थिती व भविष्याबाबत परखड विचार विनिमय करून सहकार क्षेत्राला एक नवीन दिशा देण्यासाठी सहकार परिषदेचे आयोजन केले आहे.
सहकार परिषदेचा उद्देश :
१) केंद्राचा सहकार कायदा व त्याचा महाराष्ट्रातील सहकारी चळवळीवरील परिणाम अभ्यासणे
२) सहकार क्षेत्राच्या सध्याच्या परिस्थितीची चर्चा करणे.
3) सहकार क्षेत्रापुढील आव्हानांचा विचार विनिमय करणे.
४) सहकार वृध्दिंगत करण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपायांवर चर्चा करणे.
सहकार परिषद कोणासाठी :
सहकार वृध्दिंगत करण्यासाठी दीपस्तंभासारखे कार्य करणारे सहकार क्षेत्रातील सभासद व पदाधिक सहकार वृध्दिंगत करण्यासाठी प्रामाणिकपणे भविष्यात कार्य करू इच्छिणारे विद्यार्थी व तरुण.
सहकाराचे अध्यापन करणारे प्राध्यापक, शिक्षक, प्रशिक्षक.सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे शासकीय अधिकारी.
सहकार समाजसेवा घटक असल्याने समाजातील सर्व घटक.
सध्या सहकार क्षेत्र व कायदा यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत असून यामुळे सहकारी संस्थांपुढे निर्माण होणाऱ्या आव्हानावर चर्चा करणे, सहकारातील बदलाबाबत प्रबोधन करणे, जागृती निर्माण करणे बदललेल्या कायद्यांची माहिती देवून चर्चा करणे, सहकार क्षेत्रासाठी तज्ञ मनुष्यबळ व कार्यकर्ते निर्माण करण्याचे काम कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर अर्थशास्त्र व सहकार या विषयाचे प्राध्यापक करीत असतात यासाठी ही परिषद प्राध्यापक व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे मळाई ग्रुप मधील सर्व सहकारी संस्था व दि कराड अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक कराडचे सर्व पदाधिकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. ही परिषद नक्कीच सहकार क्षेत्राला उभारी देईल असे वाटते.