बिबट्याचा शेतकऱ्यासमोरच शेळीवर हल्ला.

कुंभारगांव| कृष्णाकाठ वृत्तसेवा: कुंभारगांव  तालुका पाटण येथील मडदरा शिवारातील सुरेश सिताराम कळंत्रे यांच्या  शेतात कुंभारगांव  येथील शेतकरी दिपक हणमंतराव चव्हाण दुपारी आपल्या 6 शेळी व 7 बकरी चरण्यासाठी घेऊन गेले होते. सायंकाळी पाच वाजता   कळपातील एक शेळी कळपासून थोड्या अंतरावर चरत होती.  काही अंतरावर दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या निदर्शनास शेळी आल्याने बिबट्याने शेतकऱ्यासमोरच अचानक त्या शेळीवर हल्ला केला व शेळीस ठार केले.

 यावेळी शेळीमालक दिपक चव्हाण यांनी  आरडाओरडा करत बिबट्याच्या तावडीतून शेळीला सोडवण्यासाठी खूप प्रयत्न केला. आरडाओरडा केल्याने  तोंडात धरलेली शेळी तिथेच सोडून बिबट्याने शेजारील ऊसाच्या शेतात धूम ठोकली. 

शेळीला वाचवण्याच्या प्रयत्नात दिपक चव्हाण यांचे हात, कपडे शेळीच्या रक्ताने माखले होते यानंतर त्यांनी गांवात फोन करून माहिती दिली ग्रामस्थांना या घटनेची माहिती समजतात घटनास्थळी बघ्याची गर्दी झाली. 

यावेळी कुंभारगावचे पोलीस पाटील अमोल गायकवाड यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होत शेळी हल्ल्याची  माहिती वनविभागाला दिली यानंतर लगेच वनविभागाचे वन कर्मचारी वामन साळुंखे यांनी घटनास्थळी प्रत्यक्ष पाहणी करून शेळीचा पंचनामा केला. कुंभारगाव परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याने शेतकऱ्यांच्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.     

याबाबत शेतकऱ्यांशी बोलताना  वन कर्मचारी वामन साळुंखे म्हणाले सध्या शिवारात ऊस तोड असलेने ऊस क्षेत्र कमी होत असलेने व डोंगरातील पाणी साठे कमी झालेने बिबटे मानवी वस्तीत येऊ लागलेत तरी शेतकऱ्यांनी रात्री शिवारात एकट जाऊ नये व स्वतःची काळजी घ्यावी. 

यावेळी घटनास्थळी   दै कृष्णाकाठ प्रतिनिधी राजेंद्र पुजारी, पोलीस पाटील अमोल गायकवाड, संजय देसाई आदी उपस्थित होते.