कै. प्रा. पांडुरंग पुजारी स्मृतिदिन निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन


कराड: श्री मळाईदेवी शिक्षण संस्था, मलकापूर व विज्ञान प्रबोधिनी, कराड यांच्या संयुक्त विद्यमाने आ.च. विद्यालय व आदर्श ज्युनियर कॉलेज, मलकापूर येथे भूतपूर्व शेती शास्त्रज्ञ,थोर विचारवंत कै. प्रा.पांडुरंग पुजारी यांचा स्मृतिदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विद्यालयामध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कराड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी व आदर्श पशुपालक शेतकऱ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला होता. 

      कार्यक्रमाचे अध्यक्ष शासकीय कृषी महाविद्यालय, कराडचे प्राचार्य मा.डॉ. प्रा.एस.आर.पाटील यांनी शेतकऱ्यांना सुपीक शेती कशी करावी याबद्दल मार्गदर्शन केले. व कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे कराडचे उपविभागीय कृषी अधिकारी मा.रियाज एम.मुल्ला यांनी जमिनीचा पोत कसा सुधारता येतो व कृतीयुक्त विकसित शेती कशी करता येते याबद्दल मार्गदर्शन केले.

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेती मित्र मा.अशोकराव थोरात यांनी केले.त्यांनी प्रा. पांडुरंग पुजारी यांचा जीवनप्रवास व त्यांनी केलेली शेतीमधील नवनवीन संशोधने याबद्दलची माहिती सांगितली, तसेच उपस्थित शेतक-यांना व ग्रामस्थांना शेतीबदलचे मार्गदर्शन केले.

       स्मृतिदिन समारंभाच्या निमित्ताने विद्यालयामध्ये विज्ञान साहित्य निर्मिती स्पर्धा, शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा, वर्गसुशोधन स्पर्धा, पुष्पगुच्छ व भेटकार्ड निर्मिती स्पर्धा अशा अनेक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे व प्रमुख उपस्थिती मधील मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रम प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. मलकापूर नगर परिषदेचे विरोधी पक्षनेते अजित थोरात, जगन्नाथ मोहिते, आनंदराव पुजारी, श्रीमती कुसुमताई पुजारी ,एम.एस.जाधव,एस.एस.ताकटे (कृषी अधिकारी), मा डाॅ. दिलीप सुतार, व श्री मळाई देवी शिक्षण संस्थेचे सर्व संचालक, खजिनदार व सभासद, सद्स्य उपस्थित होते. ग्रामस्थ, प्रगतशील शेतकरी व आदर्श पशुपालक उपस्थित होते. 

       कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौ एस डी खंडागळे, सौ.एस.ए.पाटीलयांनी केले. उपस्थित मान्यवरांचे आभार मुख्याध्यापिका सौ.ए.एस. कुंभार यांनी मानले, तसेच विद्यालयाचे उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी, परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.