विषमुक्त शेती आणि अन्नाकडे जगाची वाटचाल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;

'कृष्णा'च्या कृषी महोत्सवाचे उद्घाटन, कृष्णा परिवाराचा कृषी आणि उद्योगातून समृद्धीचा प्रयत्न



कराड : येथील कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विचारमंचावर चंद्रकांत कवळेकर, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले व मान्यवर.

कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
भारत कृषीप्रधान देश असून देशातील शेतकरी हेच खरे संशोधक आहेत. गेल्या काही दशकांत रासायनिक खतांच्या वापरामुळे उत्पादन वाढले. परंतु, जमिनीचा पोत खालावत गेला. यामुळे शेतीतील विज्ञान नव्याने मांडून नवीन उद्योग समजावून घ्यावे लागतील. तसेच इस्रायलसारख्या देशाचे कृषी तंत्रज्ञान अवगत करून कृषी समृद्धीच्या दृष्टीने वाटचाल करणे गरजेचे असून जगभरातील लोकांची आता विषमुक्त शेती आणि अन्नाकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. 

तसेच कृष्णा परिवाराने कृषी आणि उद्योग हातात हात घालून चालवता येतात, हे दाखवून दिले असून यातूनच शेतकरी समृद्ध होऊ शकतो, हेही सिद्ध केले असल्याचे गौरोवोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज स्टेडियमवर कृष्णा परिवारातर्फे आयोजित कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गोव्याचे माजी उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, माजी खा. चित्रलेखा माने, कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, व्हा. चेअरमन जगदीश जगताप, डॉ. अतुल भोसले, ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, माजी आ. आनंदराव पाटील, विक्रमबाबा पाटणकर, विक्रम पावसकर, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेताळ, एकनाथ बागडी, सम्राट महाडिक, विक्रमबाबा पाटणकर, विनायक भोसले, जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सहकारमहर्षी जयवंतराव भोसले यांनी सुरू केलेले कार्य आज तीन पिढ्यांपासून अविरत चालू असून सुरेशबाबा आणि डॉ. अतुलबाबा त्याला नवा आयाम देण्याचा प्रयत्न करत आहेत, ही सेवा अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे सांगून कृष्णा कृषी आणि औद्योगिक महोत्सव सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच सहकार टिकवण्याचे केंद्र व राज्य सरकारचे धोरण आहे. त्यादृष्टीने साखर उद्योगात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय साखर सम्राटांनाही घेता आले नाहीत. मोदींमुळेच साखर उद्योगाला स्थैर्य मिळाले असून शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे आहे. सातारा जिल्ह्यात आतापर्यंत दोन लाख 45 हजार शेतकऱ्यांनी पिक विम्याचा लाभ घेतला असून केंद्र व राज्य सरकारच्या नमो शेतकरी सन्मान योजना, मागेल त्याला शेततळे, शेडनेट, ड्रीप आदी. योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ दिला जात आहे. तसेच ऑनलाईन मागणी करणाऱ्या प्रत्येकाला थेट लाभ देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यानुसार कारवाई सुरू आहे.

ते म्हणाले, कृष्णा खोऱ्यातील रखडलेल्या योजना मार्गी लावण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. आ. जयकुमार गोरेंनी सातारा जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा चेहरा-मोहरा बदलण्याचे काम जिहे-कटापूर योजनेच्या माध्यमातून केले आहे. येत्या काही दिवसात सातारा जिल्ह्यातील दुष्काळी पट्टा अशी ओळख असलेल्या भागात दुष्काळ या नावालाही शिल्लक राहणार नाही. तसेच शेतकऱ्यांना सौर ऊर्जेद्वारे 12 तास वीज देणार असून आगामी काळात कृषी पाणीपुरवठा योजनाही सौर ऊर्जेवर चालवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, डॉ. अतुलबाबा भोसले हे फक्त राजकारणी नसून सर्वांचे कल्याण करणार आहेत. करोना काळात कृष्णा परिवाराने केलेले काम उल्लेखनीय असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.

उदयनराजे भोसले म्हणाले, कृष्णा-कोयनेच्या धर्तीवर याठिकाणी कृष्णा महोत्सवाचा संगम घडवून आणण्याचे काम कृष्णा परिवाराने केले आहे. त्याबद्धल डॉ. सुरेश भोसले व डॉ. अतुल भोसले यांचे मी आभार मानतो. हा कृषी महोत्सव सातारा जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वाशी त्यांनी व्यक्त केला.

डॉ. सुरेश भोसले, म्हणाले जयवंतराव भोसले यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भव्य कार्यक्रम घेण्याचा आमचा मानस होता. राज्य सरकार व फडणवीस  साहेबांच्या सहकार्यानेच हे शक्य झाले. राज्यात सलग 15 वर्षे देशात सर्वात जास्त दर देणारा कृष्णा कारखाना होता. सहकारात सर्वात जास्त योजनाही कृष्णा कारखान्याने सुरू केल्या. आज रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी जिवाणू खते तयार करण्याचे काम कारखान्याच्या माध्यमातून केले जात आहे. तसेच भाजप सरकारच्या विविध सहकार हिताच्या धोरणामुळेच कारखानदारी वाचली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच डॉ. अतुल भोसले यांनी पुढच्या पाच वर्षांचे कराड व्हिजन तयार केले असून त्यांच्या गॉड फादर यांच्या सहकार्यातून ते पूर्ण करण्याचा नक्कीच ते प्रयत्न करतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

प्रास्ताविकात डॉ. अतुल भोसले म्हणाले, कराड ही कृषी क्षेत्राची राजधानी आहे. येथील शेतकऱ्यांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळावे, नवनवीन उत्पादने राज्य, देश व विदेशात पोहोचवण्यासाठी हा महोत्सव फायदेशीर ठरणार आहे. नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांसाठी राबवलेल्या विविध योजना अत्यंत फायदेशीर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.