ना. शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्याने कोरोना काळातील पाटणच्या नागरिकांवरील नियम उल्लंघनाचे गुन्हे मागे.

२५० हून अधिक पाटणवासीयांना मिळाला दिलासा.पाटण |कृष्णाकाठ वृत्तसेवा: 

कोरोना काळातील कटू आठवणी विसरता येणाऱ्या नाहीत. असे विश्वव्यापी महासंकट सारे जग पहिल्यांदाच अनुभवत होते. २०२०-२१ मध्ये कोरोना महामारीने आपल्या देशभरात आणि महाराष्ट्रातही थैमान घातले होते. मोठमोठी शहरे ओस पडत होती. अनेक जणांना या महासाथीमुळे आपले प्रियजन गमवावे लागले. 

त्यावेळी कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये व संसर्ग नसलेल्या ठिकाणी नागरिकांच्या जीवितास धोका पोहोचू नये म्हणून सर्वच स्तरावर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात येत होत्या. सातारा जिल्ह्यातदेखील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणातर्फे विविध निर्बंध लादण्यात आले होते. त्यामध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या व्यक्तींवर निर्बंध होते. दुकाने, बाजार सुरू ठेवण्यावर निर्बंध होते. मास्कची सक्ती करण्यात आलेली होती. यामागे उद्देश हाच होता की, कोरोना विषाणूचा प्रसार रोखून महासाथ आटोक्यात आणणे. 

परंतु तरीदेखील अनेक भागांत हे निर्बंध पाळले जात नव्हते. मग अशा व्यक्तींवर प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केले म्हणून गुन्हेदेखील दाखल करण्यात आले होते. यात पाटणमध्ये अशाप्रकारचे कोरोना कालावधीत एकूण ७४ गुन्हे दाखल करण्यात आले होते. या  ७४ प्रकरणांमध्ये सुमारे २०० व्यक्तींविरुद्ध न्यायालयात खटले देखील प्रलंबित होते.मात्र तो काळच आव्हानांचा होता. अनवधानाने, तसेच साथीची तीव्रता लक्षात न आल्याने काहीशा बेदरकार वृत्तीमुळे काही व्यक्तींकडून हे नियमांचे उल्लंघन तेव्हा घडले. परंतु सदर गुन्हे किरकोळ स्वरूपाचे असल्याने याबाबत पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांनी प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीची तातडीने बैठक घेऊन शासननिर्णयातील तरतुदीनुसार असे खटले काढून घेण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. 

त्यानुसार प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी पोलीस उपअधीक्षक विवेक लावंड आणि सरकारी अभियोक्ता वैशाली पाटील यांच्यासमवेत जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी व पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली २८ डिसेंबर २०२३ रोजी समितीची बैठक घेतली. त्यानुसार समितीने विचारविनिमय करून कोरोना कालावधीतील सुमारे ७४ खटले काढून घेण्यास मान्यता दिली आहे. यामुळे २०० पेक्षा अधिक नागरिकांची खटल्यांपासून मुक्तता झाली आहे. याशिवाय २ सामाजिक व राजकीय स्वरूपाचेदेखील खटले यानिमित्ताने मागे घेऊन त्यामध्येही सुमारे ३९ नागरिकांना दिलासा मिळाला आहे.


खटले मागे घेण्यासंदर्भातील दोन वर्षांपासूनची संबंधित नागरिकांची मागणी पालकमंत्री  ना. शंभूराज देसाई यांच्या पाठपुराव्यामुळे पूर्ण झाल्याने नागरिकांनी  ना. शंभूराज देसाई यांचे आभार मानले आहेत. तसेच त्यांच्या सूचनेनुसार समितीने नागरिकांना दिलासा दिल्याबद्दल संबंधितांनी आनंद व्यक्त केला आहे.