10 वी व 12 वी बोर्ड परीक्षांवर बहिष्काराचा निर्णय :


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
महाराष्ट्र राज्यातील इयत्ता दहावी व इयत्ता बारावीच्या प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा पुढील महिन्यापासून सुरू होणार आहेत. सदर परीक्षेवर बहिष्कार घालण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे यांनी नुकताच घेतला.

           सदर बाबतचे निवेदन आज मंगळवार दि.16/01/2024 रोजी महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष व सातारा जिल्हा शिक्षण संस्था संघाचे अध्यक्ष अशोकराव थोरात व शिक्षण संस्था महामंडळाचे कोल्हापूर विभागाचे अध्यक्ष शिवाजी नाना माळकर यांनी इयत्ता दहावी व इयत्ता बारावी बोर्ड परीक्षांचे सहाय्यक सचिव संजय चव्हाण यांना समक्ष दिले. यावेळी श्री शिवाजी मराठा बोर्डिंगचे श्री बोराडे सर उपस्थित होते.

          महाराष्ट्र राज्याचे शिक्षण मंत्रालय,उच्च शिक्षण मंत्री यांनी आश्वासने देऊनही पालक व विद्यार्थी हिताचे निर्णय घेतले नाहीत. महाराष्ट्र शिक्षणाच्या बाबतीत मागे पडत चालला आहे व महाराष्ट्र सरकार खाजगीकरणाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातून बाहेर पडत आहे,भारताच्या राज्यघटनेप्रमाणे व शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे मोफत व सक्तीचे शिक्षण देणे ही राज्य व केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

     महाराष्ट्रामधील सर्व शिक्षण संस्था संघ व महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ पुणे हे गेली अनेक वर्षे पालक व विद्यार्थ्यांचे हित जोपासण्यासाठी तसेच शिक्षक व विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी हा महत्वपूर्ण निर्णय शिक्षण संस्था महामंडळाने घेतला आहे.

          या प्रसंगी माजी प्राचार्य आर.आर.पाटील,माजी उप मुख्याध्यापक अनिल शिर्के व इतर संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.