पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांच्याकडून मयत मतदारांसंदर्भात ढेबेवाडी विभागात प्रत्यक्ष पाहणी.

तळमावले| कृष्णाकाठ वृत्तसेवा:

पाटण तालुक्यातील ढेबेवाडी व तळमावले येथील महसूल मंडलातील बी.एल.ओ यांच्यामार्फत मयत मतदारांची यादी बनवून त्यांची नावे मतदारयादीतून वगळण्याची प्रक्रिया सुरू आहे. आज पाटणचे प्रांताधिकारी सुनील गाडे यांनी या कामाचा आढावा घेण्यासाठी ढेबेवाडी विभागात प्रत्यक्ष पाहणी केली. तसेच मृत्यूच्या नोंदी नसलेल्या ठिकाणी संबंधित मयत मतदारांच्या नातेवाईकांचे जबाब घेऊन त्यानुसार फॉर्म नं. ७ भरण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. 

याबाबत माहिती देताना प्रांताधिकारी सुनील गाडे म्हणाले की, बी.एल.ओ. यांच्यामार्फत जास्तीत जास्त मयत मतदारांबाबत फॉर्म नं. ७ भरून घेतले जात आहेत. तसेच विवाह होऊन पूर्वीच दुसऱ्या गावी, राहण्यास गेलेल्या अनेक मुलींची नावे पाटण तालुक्यातील त्यांच्या मूळ गावांतील मतदारयादीत आहेत. अशा मुलींच्या वडील, भाऊ व नातेवाईक यांचा जबाब व पंचनामा घेऊन त्यांची नावे त्या गावातील मतदारयादीतून कमी करण्यात येत आहेत. त्याचबरोबर गावात नव्याने विवाह होऊन आलेल्या मुलींचेदेखील नाव नोंदविण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही सुनील गाडे यांनी सांगितले.

प्रांताधिकारी श्री. सुनील गाडे यांनी पाटण शहरातील बी.एल.ओ. यांची बैठक घेऊन उर्वरित मयत मतदारांबाबत फॉर्म नं. ७ भरून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच तहसील कार्यालयात हे फॉर्म पाठवण्याचे काम सुरू आहे. युद्धपातळीवर मयत मतदारांची नावे कमी करणे व नवीन मतदारांची नोंदणी वाढविण्याचे काम करण्यात येत आहे. तालुक्यात एकही नायब तहसीलदार नसतानासुद्धा प्रांताधिकारी सुनील गाडे यांच्या कार्यतत्परता आणि अथक प्रयत्नांमुळे सुधारित मतदारयादी बनवण्याचे काम सुरळीतपणे सुरू आहे. याबद्दल तालुक्यातील नागरिकांमध्ये प्रांताधिकारी सुनील गाडे यांचे कौतुक होत आहे.