शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन लक्ष्मण बोत्रे यांच्या भगिनी तसेच शिवसमर्थ चे व्यवस्थापक श्री.नितीन दिनकर पाटील यांच्या मातोश्री कमल दिनकर पाटील यांचे बुधवार दि.6 डिसेंबर, 2023 रोजी तृतीय पुण्यस्मरण येत आहे. त्यानिमित्त्त त्यांच्याबद्दल थोडंसं...
काही माणसं कर्तृत्वापेक्षा आपल्या स्वभावामुळे लोकांच्या मनात कायमची घर करुन राहतात. त्यांचे वागणे हेच त्यांचे कर्तृत्व असते. अशीच एक व्यक्ती म्हणजे माझ्या सासुबाई सौ.कमल दिनकर पाटील. दोन वर्शापूर्वी त्यांच्या आकस्मिक जाण्याची बातमी ऐकताच डोळ्याातील अश्रूंनी आपली वाट आपोआप रिकामी केली. त्यांच्या अनेक आठवणी डोळ्यांसमोर तरळून गेल्या. मुळात माझ्या सासुबाई मितभाषी होत्या. कुणाशी जास्त बोलत नसत. घरातल्या कामात त्यांनी स्वतःला गुंतवून घेतले होते. घरामध्ये कोणीही व्यक्ती आली तर त्याला तांब्याभर चहा आणि एक कप चहा दिल्याशिवाय गेलेली व्यक्ती मला तर आठवत नाही. स्वतः आजारी नसलेली व्यक्ती दुसऱ्याबरोबर व्यवस्थित बोलेल, गप्पा मारील, त्याचा पाहुणचार व्यवस्थित करेल पण ज्यांच्या जगण्याला औषधाचीच कायम साथ लाभली त्या माझ्या सासुबाई लोकांना चहापाणी देताना आपले दुःख नेहमी विसरलेल्या जाणवल्या. इतरांसाठी त्यांचे आजारपण कधीही आड आले नाही. नेहमी इतरांशी बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर हास्य जाणवत असे. आलेल्या प्रत्येक संकटाला जणू हसतमुख सामोरे गेले पाहीजे याचे त्या संदेश देत आहेत असे मला वाटते.
आपल्या आयुष्यात त्यांनी कधी कुणाला दुखावले नाही किंवा एखाद्याला उलट प्रतिउत्तर दिले नाही. समोरची व्यक्ती कधी त्यांना रागावून बोलली तर त्या व्यक्तीला हसत बोलायच्या माणसाने आपले आयुष्य कसे जगावे याचा जणू वस्तुपाठच त्यांनी आम्हांला दिला. जीवनाचे केवढे मोठे तत्त्व त्यांच्या वागण्या बोलण्यातून जाणवत असे. आज या सर्व गोष्टीला आम्ही पारखे होतोय. आतादेखील त्यांच्या आठवणी, त्यांच्याबरोबरचे प्रसंग आठवताना अश्रू थांबत नाहीत.
‘‘पावणं बायडीला खाली पाठवा, माझा स्पंदन कसा आहे? आई-तात्या चांगली हायतं का?’’ ही वाक्ये कानात अजूनही घुमत आहेत.
त्यांचे कर्तृत्व काय आहे असे मला विचारले तर मी म्हणेन, ‘‘आपल्या आईवडीलांची सेवा मनापासून, न कुरकुरता, न थकता, न कंटाळता, स्वतःचे आजारपण विसरुन केली हेच त्यांच्या जीवनातील मोठे कर्तृत्व आहे आपल्या आयुष्यात त्यांनी कुणाला दुखावले नाही हे त्यांचे कर्तृत्व आहे. सर्व आले गेलेल्या माणंसाना आपुलकी लावणं हेच त्यांचे मोठे कर्तृत्व आहे.’’
आईवडीलांची केलेली सेवा, आपल्या मुला बाळांना लावलेला लळा, भावावरील माया, प्रत्येक पाहुण्याला घरी आल्यानंतर दिलेला चहापाणी या आठवणी त्यांना जावून दोन वर्षे पूर्ण झाले तरी अजूनही मनामध्ये त्यांच्या आठवणी कालवाकालव करत आहेत. प्रेमाची सावली असलेल्या सौ.कमल दिनकर पाटील यांना तृतीय पुण्यस्मरणानिमित्त विनम्र अभिवादन....!
शब्दांकन : डाॅ.संदीप डाकवे
मो.97640 61633