पाटण| कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पाटण विधानसभा मतदारसंघात नवीन मतदारांची विशेषतः 18 ते 19 वयोगटातील मतदारांची मतदार यादीत नाव नोंदविण्याची मोहीम सुरू आहे. पाटण विधानसभा मतदार संघात एकूण मतदार संख्येच्या तुलनेत 3.5% मतदार म्हणजे सुमारे 10000 पेक्षा थोडे अधिक 18 ते 19 वयोगटातील मतदार असणे अपेक्षित आहे .मात्र सद्यस्थितीत मतदार यादीत सुमारे 4000 मतदार 18 ते 19 वयोगटातील आहेत. सुमारे 6000 नवीन मतदार अजूनही नोंदणीसाठी पुढे येत नसल्याचे चित्र आहे. रोजगारनिर्मित बाहेरगावी असणे, शिक्षणासाठी कराड , सातारा पुणे आदी ठिकाणी असणे, माहिती नसणे ही त्याची काही प्रमुख कारणे सांगता येतील.प्रशासकीय स्तरावर वेळोवेळी बैठका घेऊन , किंवा विविध राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आवाहन करून देखील मतदार नोंदणीत फारसी वाढ होत नसल्याने जिल्हाधिकारी सातारा श्री जितेंद्र डूडी यांनी vc द्वारे प्रत्यक्ष गावात जाऊन नेमकी काय अडचण आहे ते पाहण्याच्या सूचना केल्या त्यानुसार पाटण चे प्रांताधिकारी संध्याकाळी 7 वाजता कोयनानगर परिसरातील दुर्गम भागातील ऐनाचीवाडी परिसरात गेले. सहज गप्पा मारत मारत स्थानिक नागरिकांना गावात नवीन मतदार कुणी नोंदणीसाठी शिल्लक आहे का? असे विचारले त्यावेळी कुणीच नाही सर्वांची नोंदणी झाली असे उत्तर मिळाले. त्यानंतर गावात किती मुले व मुली 12वी किंवा त्यापुढच्या वर्गात आहेत अशी विचारणा केली.त्यावेळी स्थानिक अंगणवाडी सेविका यांनी एक नाव सांगितले ,तिचे नाव नोंदले नसल्याचे तिच्याशी फोन वर बोलताना समजले, अजून किती मुली गावात अशा असतील अशी तिला विचारणा केल्यावर तिने 4 ते 5 मुलींचे नाव सांगितले तसेच त्यांची नावे देखील नोंदली नसल्याचे सांगितले आहे, याशिवाय 2 मुले पण अशी आढळली की ज्यांची नाव नोंदणी केलेली नव्हती..या सर्वांना स्थानिक सरपंच यांचे मदतीने लगेच बोलावून घेतले . त्यांची वयाची खात्री करण्यासाठी आधार कार्ड घेऊन बोलावले.त्यांचे आधार कार्ड तपासल्या नंतर 1 मुलगा वगळता बाकीचे सर्व नवीन मतदार असून त्यांची नोंदणी करणे गरजेचे असल्याचे लक्षात आले व त्यांना तसे सांगितले. मतदानाच्या अधिकाराबाबत हे नवीन मतदार जागरूक दिसून आले. त्यामुळे लगेच सर्वांचे आधार कार्ड चे फोटो घेऊन जागेवरच नाव नोंदणीची प्रक्रिया सुरू केली. अशी बाब पूर्ण तालुक्यात असल्याची शक्यता असल्याने या नव मतदारांनी तालुक्यातील नवीन मतदार विशेषतः मुलींनी त्यांचे मतदार यादीत नाव नोंदविण्याचे देखील आवाहन केले. तसेच थेट गावात येऊन वरिष्ठ अधिकारी यांनी मतदार नोंदणी केल्याने या मतदारांनी समाधान व्यक्त केले.
पाटण तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणा तुटपुंज्या मनुष्य बाळाच्या आधारे तालुक्यातील खेडोपाडी अगदी दुर्गम भागात देखील संध्याकाळच्या वेळी जाऊन नवीन मतदार नोंदणीसाठी परिश्रम घेत असल्याने स्थानिक सरपंच ग्रामस्थ यांनी समाधान व्यक्त केले आहे.तसेच मतदार नोंदणी साठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे.
या नव मतदार नोंदणी साठी प्रांताधिकारी सुनील गाढे यांचे समवेत , स्थानिक प्रतिष्ठित ग्रामस्थ लहूराज रामचंद्र कदम, कृष्णात कदम प्रकाश भिवाजी यादव, राजेंद्र श्रीपती कदम तसेच मंडल अधिकारी संजय जंगम , तलाठी निलेश भाग्यवंत ,वैशाली जाधव , एस जी बोबडे , के एस देवकर , मतदान केंद्र स्तरीय अधिकारी लक्ष्मी आनंद कदम, कोतवाल जगन्नाथ सपकाळ अंगणवाडी सेविका मीनाताई अंकुश कदम आदी उपस्थित होते.