धामणी येथील त्या युवकाच्या आत्महत्ये प्रकरणी संशयितांना अटक करा: नाभिक संघटनेचे पोलिसांना निवेदन


 ढेबेवाडी| कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
पाटण तालुक्यातील धामणी येथील अजय प्रकाश महाजन (वय २७) या युवकाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या प्रकरणाचा कसून तपास करून संशयितांना अटक करावी, अशी मागणी स्वाभिमानी नाभिक संघटनेने ढेबेवाडी येथील पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून केली.

धामणी येथील अजय महाजन या युवकाने चार डिसेंबरला राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. अजय हा शुभकार्य, उत्सव व समारंभात डेकोरेशन करण्याचा व्यवसाय करत होता. याप्रकरणी येथील पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, विविध बाबींवर तपास सुरू असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. स्वाभिमानी नाभिक संघटनेचे राज्य अध्यक्ष शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली संघटनेचे पदाधिकारी सदस्य तसेच नाभिक बांधवांनी येथील पोलिस ठाण्यात जाऊन सहायक पोलिस निरीक्षक अभिजित चौधरी यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी श्री. चौधरी यांना संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. या प्रकरणाची कसून चौकशी करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करावी, या प्रकरणाची फेर चौकशी करून दोषीना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी. यापुढे कोणत्याही समाजात असे गुन्हे होऊ नयेत, अशा प्रकारांना आळा बसावा, संबंधित संशयितांना अटक करून योग्य ती शिक्षा व्हावी, अशी मागणी करण्यात आली.

यावेळी स्वाभिमानी नाभिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अधिकराव चव्हाण, राज्य कार्याध्यक्ष प्रदीप काशीद, तालुकाध्यक्ष बाबूराव पवार, जिल्हा सरचिटणीस संदीप पवार, जिवाजी महाले उत्सव समितीचे सदस्य विष्णू सपकाळ, तालुका उपाध्यक्ष शिवाजी गायकवाड, तालुका सचिव नीलकंठ पवार, विभाग प्रमुख दाजी सुर्वे, उंब्रज शहराध्यक्ष तानाजी भांदिगें आदींसह सदस्य, समाज बांधव उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांनी महाजन कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. दरम्यान या प्रकरणाचा कसून तपास सुरू असल्याचे सहायक पोलिस निरीक्षक चौधरी यांनी सांगितले.