पाटण मधील नवविवाहित मुलींनी आपली नावे मतदार यादीत नोंदविण्यासाठी पुढे यावे:प्रांताधिकारी सुनील गाढे


पाटण|कृष्णाकाठ वृत्तसेवा
सध्या सर्वत्र मतदार यादीचे शुद्धीकरण करण्याचे काम सुरू असून त्यानुसार पाटण विधानसभा मतदारसंघात मयत, दुबार व विवाहानिमित्त परगावी कायम स्थलांतरित झालेल्या मतदारांचे नावे कमी करण्याची कार्यवाही सुरू आहे. त्यानुसार पाटण विधानसभा मतदार संघात सुमारे 12000 मयत मतदारांची नावे कमी करण्याची कार्यवाही सुरू असून विवाहामुळे परगावी स्थलांतरित झालेल्या मुलींची देखील नावे कमी करण्यात येत आहेत. या सोबतच नवीन 18 ते 19 वयोगटातील नवीन मतदारांची देखील नावे नोंदविण्याची कार्यवाही सुरू आहे. आतापर्यंत 6500 नवीन मतदारांची नोंदणी पाटण मध्ये करण्यात आली आहे. अजूनही पाटण मध्ये बरेच विद्यार्थी हे शिक्षणानिमित कराड सातारा इस्लामपूर पुणे आदी ठिकाणी गेलेले असल्याने त्यांची नावे अजून नोंदविण्यात आलेली नसल्याचे दिसून आलेली आहेत. याशिवाय नवीन लग्न झालेल्या मुलींची नावे देखील अजून पाहिजे त्या प्रमाणात नोंदविलेली नाहीत. अशा नवविवाहित मुलींमध्ये 18 ते 19 वयोगटाचे प्रमाण लक्षणीय असून त्यांची देखील नावे नोंदविणे आवश्यक आहे.


 या बाबी लक्षात घेऊन पाटण चे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी या नविन मतदारांची नावे मतदार यादीत नोंदविण्याची मोहीम उघडली असून त्याचाच एक भाग म्हणून आज बोंद्री या गावी भेट दिली असता त्या ठिकाणी नवीन विवाह झालेल्या मुलींची नावे BLO यांचे समक्ष नोंदवून घेण्यात आली आहेत. या निमित्ताने तालुक्यातील सर्व नवविवाहित मुलींची नावे मतदार यादीत नोंदविण्याचे आवाहन प्रांताधिकारी सुनील गाढे यांनी केले असून अशा मुलींची विवाह नोंदणी नसल्यास ती स्थानिक ग्रामसेवक यांनी तातडीने अशी नोंदणी करून घेण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत. त्यामुळे अशा नवविवाहित मुलींना त्यांची नावे सासरकडील नावाने नोंद करून घेण्यास अडचण येणार नाही बोंद्री गावात समक्ष भेट देऊन तातडीने 3 नवविवाहित मुलींची online नावं नोंदणी करून घेऊन त्यांना मतदानाचा अधिकार जागेवरच उपलब्ध करून दिल्या मुळे संबंधित नवविवाहित मुली व ग्रामस्थांनी प्रांताधिकारी सुनील गाढे व तहसीलदार रमेश पाटील हे घेत असलेल्या मेहनती बाबत समाधान व्यक्त केले आहे.