तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
‘‘तुम्हीच आमचे आदर्श आहात, तुम्ही शरिराने दिव्यांग असाल परंतू मनाने बळकट आहात. आपण समाजापुढे एक आदर्श निर्माण करत आहात. जबरदस्त इच्छाशक्ती आणि प्रयत्न यामुळे तुम्ही आपाआपल्या क्षेत्रात उत्तम काम करत आहात. ही बाब अभिमानाची आहे. आपल्याला मनापासून सलाम ’’ असे उद्गार प्राथमिक आरोग्य केंद्र ढेबेवाडीचे वैद्यकीय अधिकारी डाॅ.सुहेल शिकलगार यांनी व्यक्त केले. ते शिवसमर्थ संस्था आणि परिवार यांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘दिव्यांग बांधवाच्या सन्मान सोहळयात बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर शिवसमर्थ परिवाराचे कुटूंबप्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे, शिवाजी सुर्वे, ढेबेवाडी पोलीस स्टेशनचे गणेश भोसले, निकम हवालदार, देवबा वायचळ सर, अमित शिंदे व अन्य मान्यवर उपस्थित होते.
डाॅ.शिकलगार बोलताना पुढे म्हणाले की, शिवसमर्थ परिवाराने जागतिक दिव्यांग दिनानिमित्त्त दिव्यांग बांधवांचा आयोजित केलेला सन्मान सोहळा अतिशय कौतुकास्पद असा आहे. यामुळे दिव्यांगांना जगण्याची उभारी नक्कीच मिळेल.
देवबा वायचळ सर म्हणाले की, आपले शरीर कमकुवत असले तरी आपले मन मजबूत आहे. प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर आपण आपल्या दुर्बलतेला हरवत जगण्याची लढाई जिंकत आहात ही प्रेरणादायी बाब आहे. आजच्या धावपळीच्या युगात शिवसमर्थ परिवाराने आपल्या खांद्यावर टाकलेली मायेची थाप नक्कीच उर्जादायी असेल.
शिवसमर्थ संस्था आणि परिवाराच्या माध्यमातून जेवढी सामाजिक बांधिलकी जपता येईल ती आम्ही जपण्याचा प्रयत्न करत असतो. आज दिव्यांगांना सन्मानाने वागवले जात नाहीत. त्यामुळे अशा लोकांचा आम्ही शाल, श्रीफळ, रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह देवून सन्मान केला आहे. तसेच त्यांच्या असणाऱ्या समस्या आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. याशिवाय आम्ही आमच्या संस्थेच्या विविध शाखांमध्ये दिव्यांग असलेले कर्मचारी घेवून त्यांच्या प्रतिभेला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. असे मत शिवसमर्थ कुटूंबाचे प्रमुख अॅड.जनार्दन बोत्रे यांनी या प्रसंगी व्यक्त केले.
शिवसमर्थ परिवाराने विभागातील दिव्यांग बांधवांना एकत्र करुन त्यांचा शाल श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देवून सन्मान केला. तसेच या कार्यक्रमात सर्व दिव्यांग बांधवांचा परिचय देखील एकमेकांना करुन देण्यात आला. कार्यक्रमानंतर सर्व दिव्यांग बांधवांना चहा आणि अल्पोपहार देण्यात आला. याप्रसंगी कुमार देसाई यांनी शिवसमर्थ परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त करणारे मनोगत व्यक्त केले. या आगळया वेगळया कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष वीर यांनी, सुत्रसंचालन डाॅ.संदीप डाकवे यांनी तर आभार प्रदर्शन रविंद्र पाटील यांनी केले.
-----------------------------------------------------------------------
अनोख्या सन्मानाने दिव्यांग बांधव भारावले
शिवसमर्थ परिवाराने सर्व दिव्यांग बांधवांना आपुलकीने बोलावून त्यांचा यथोचित शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह आणि रोख रक्कम देवून सन्मान केला. या कृतज्ञ सोहळयाने काही दिव्यांग बांधवांच्या डोळयांत अश्रू आले त्यांनी भावनिक होत संस्थेचे आणि अॅड.जनार्दन बात्रे साहेब यांचे आभार मानले.
------------------------------------------------------------------------