पाटण तालुका ग्रामपंचायत निकाल : देसाई गटाचे वर्चस्व; पाटणकरांची पिछेहाट


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाने अनेक ठिकाणी सत्तांतर करत वर्चस्व राखले. पाटण तालुक्यात 18 पैकी 12 ग्रामपंचायती या देसाई गटाकडे तर पाटणकर गटाकडे 4, काॅंग्रेस 1 आणि अपक्ष 1 असे बालाबल आहे. 

तर बहुचर्चित मल्हारपेठ ग्रामपंचायतीत सत्तांतर करत ठाकरे आणि शरद पवार गटाला धक्का दिला आहे. एकूणच निकालात पाटणकर गटाचे राजकीय मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. मल्हारपेठ ग्रामपंचायतीत देसाई गटाने 9- 3 असा विजय मिळवत लक्षवेधी ठरलेल्या लोकनियुक्त सरपंच निवडीत 375 मतांनी किरण दशवंत यांनी बाजी मारली. 

पालकमंत्री शंभूराज देसाई यांची सत्ता असलेल्या ग्रामपंचायती :

1)बेलवडे ग्रामपंचायत सत्तांतर झाले असून पालकमंत्री देसाई गटाने सरपंच पदासह 6 जागांवर विजय मिळवला. तर पराभूत पाटणकर गटाला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागले. 2) किल्ले मोरगिरी ग्रामपंचायती देसाई गटाने सत्ता राखण्यात यश मिळवले. 3)निवी ग्रामपंचायत सरपंच पदासह देसाई गटाने राखली आहे. निवी ग्रामपंचायत बिनविरोध झाली होती. याठिकाणी 2 जागांसाठी निवडणूक लागली, त्याठिकाणी देसाई गटाने बाजी मारली. 4)पाटण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या मल्हारपेठ ग्रामपंचायतीत सत्तांतर करत देसाई गटाने 9-3 असा विजय मिळवला. याठिकाणी लोकनियुक्त सरपंचपदी किरण दशवंत यांनी 375 मतांच्या फरकाने विजय मिळवला तर ठाकरे गट आणि पाटणकर गटाला 3 जागांवर समाधान मानावे लागले. 5)मरळी ग्रामपंचायतीत तिरंगी लढत झाली, यामध्ये देसाई गटाचे दोन पॅनेल होते. तर पाटणकर गटाचे एक पॅनेल होते. येथे पाटणकर गटाचा धुव्वा उडाला असून सरपंच पदासह 3 जागांवर माजी जिल्हा परिषद सदस्य जे. ए. पाटील यांच्या पॅनेलने विजय मिळवला तर माजी सरपंच प्रविण पाटील यांच्या पॅनेलने 6 जागांवर विजय मिळवला. 6,7)शितपवाडी, जमदाडवाडी ग्रामपंचायतीत देसाई गटाने विजय मिळवला. 8) देसाई गटाने कुसरुंड ग्रामपंचायत सत्तांतर करत विरोधकांना धक्का दिला. 9) गावडेवाडी येथे देसाई आणि पाटणकर गटाने 3-3 जागा मिळवल्या, परंतु सरपंच पदावर देसाई गटाने बाजी मारल्याने सत्तांतर करत सत्ता मिळवली. 10) जिंती ग्रामपंचायतीत देसाई गटाने सत्तांतर घडवून आणले असून येथे देसाई गटाला सरपंच पद आणि 7 सदस्य विजयी झाले. 11) कळकेवाडी ग्रामपंचायतीत सरपंच पदासह देसाई गटाने बाजी मारली. 12) मुंद्रुळकोळे ग्रामपंचायतीत सत्तांतर करत देसाई गटाने विजय मिळवल्याने ढेबेवाडी विभागातील मोठी ग्रामपंचायत देसाई गटाला मिळाली.

पाटणकर गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायती खालीलप्रमाणे

13) नारळवाडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाने सरपंच पदासह सत्ता मिळवली आहे.14) केर ग्रामपंचायतीत सत्ताधारी राष्ट्रावादीच्या शरद पवार गटाच्या पाटणकर गटाला सत्ता राखण्यात यश आले असून पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या गटाला व्हाईटवाॅश दिला आहे. सरपंच पदासह सर्व जागांवर शरद पवार गटाने विजय मिळवला. 15) गाडखोप ग्रामपंचायतीत महाविकास आघाडीने विजय मिळवला. 16) रूवले ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पाटणकर गटाकडून सत्तांतर 8-0 असा पालकमंत्री देसाई गटाचा धुव्वा उडवला. यावेळी समान मते पडल्याने चिठ्ठी काढण्यात आली, त्यामध्येही पाटणकर गटाच्या उमेदवारांचे नाव निघाले.

काॅंग्रेसकडून मुंद्रुळ कोळे गेले, खुर्द राखले

17) मंद्रूळ कोळे ग्रामपंचायतीत काॅंग्रेचे प्रांतिक सदस्य हिंदूराव पाटील यांची सत्ता होती. मात्र, याठिकाणी पालकमंत्री शंभूराज देसाई आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या गटाने सत्तांतर करत महायुतीचा विजय मिळवला. यामुळे काॅंग्रेसच्या ताब्यातून मुंद्रुळ कोळे ही ग्रामपंचायत गेली आहे. तर मुंद्रुळ खुर्द ही ग्रामपंचायत राखण्यात काॅंग्रेसचे हिंदुराव पाटील यांना यश आले आहे. 18) रामिष्टेवाडी ग्रामपंचायतीत जनसेवा परिवर्तन पँनेल विजयी झाले असून त्यांनी कोणत्याही पक्षाचा पाठिंबा असल्याचे जाहिर केले नाही.