तळमावले|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
हुतात्मा राष्ट्रबंधू राजीवभाई दिक्षीत यांच्या जयंती व पुण्यतिथी दिनी दिनानिमित्त श्री काळेश्वर ग्रामविकास प्रतिष्ठान आणि स्वदेशी भारत बचत गट सकुंडे मळा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रकाशित पुस्तक स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेत डाॅ.संदीप डाकवे यांच्या ‘तात्या’ या पुस्तकाला स्वदेशी भारत सन्मान पुरस्कार जाहीर झाला असल्याची माहिती संयोजक प्रकाश सकुंडे व वसंत सकुंडे यांनी दिली. या स्पर्धेस महाराष्ट्रासह केरळमधूनही साहित्यिकांचा प्रतिसाद लाभला आहे.
डाॅ.संदीप डाकवे यांनी लिहलेले हे दहावे पुस्तक आहे. ‘तात्या’ या पुस्तकात स्व.राजाराम डाकवे (तात्या) यांचा संपूर्ण जीवनपट अतिशय सुंदर पध्दतीने मांडला आहे. ग्रामीण भाषा शैलीचा बाज या पुस्तकात आहे. सुप्रसिध्द व्याख्याते आणि लेखक प्राचार्य डाॅ.यशवंत पाटणे यांची कसदार प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे. क्यु आर कोडच्या माध्यमातून तात्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग यात पहायला मिळत आहेत. हे या पुस्तकाचे वेगळेपण आहे. स्वदेशी भारत साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण केले जाणार असून हे या संमलेनाचे 13 वे वर्ष आहे. विविध क्षेत्रातील दिग्गजानी 'तात्या' या पुस्तकाचे कौतुक केले आहे. अभिनेते किरण माने, अभिनेते माधव अभ्यंकर यांनी देखील या पुस्तकाबद्दल गौरवोद्गार काढले आहेत.
‘तात्या’ या पुस्तकाला ‘स्वदेशी भारत सन्मान’ हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अनेक मान्यवरांनी डाॅ.संदीप डाकवे यांचे अभिनंदन केले आहे.
प्रतिक्रियाचे 'ई बुक'
'तात्या' या पुस्तकावर आलेल्या प्रतिक्रियाचे 'तात्यांची स्पंदने' या नावाचे 'ई बुक' प्रकाशित करणार असल्याची माहिती पुस्तकाचे लेखक डॉ. संदीप डाकवे यांनी याप्रसंगी दिली.