पाटणला गुरुवारपासून पोलिस पाटलांचे उपोषण

मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी निर्णय.तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
तळमावले ता.पाटण मानधनात वाढ करण्यासह ते महिन्याचे महिन्याला मिळावे यासह इतर विविध मागण्यासाठी येत्या गुरुवारपासून (ता१६) आमरण उपोषण सुरू करत असल्याचे निवेदन पोलिस पाटील संघटनांच्या वतीने देण्यात आले. ढेबेवाडी विभागातील शेंडेवाडीचे पोलिस पाटील संतोष पवार व रामीष्टेवाडीचे पोलिस पाटील बजरंग रामीष्टे आमरण उपोषण करणार असून पाटण तालुक्यातील पोलिस पाटील साखळी उपोषनाने त्यात सहभाग नोंदविणार आहेत.


निवेदनातील माहिती अशी,पोलिस पाटलांचे मानधन वाढवावे यासह इतर प्रलंबित मागण्या संदर्भात वारंवार निवेदने देवूनही सध्याचे सरकार त्याचा गांभीर्याने विचार करत नाही.सध्याचे तुटपुंजे ६५०० मानधन नियुक्ती झाल्यापासून आजपर्यंत कधीच वेळेत महिन्याच्या महिन्याला मिळालेले नाही. तुटपुंज्या मानधनात कुटुंबाचा उदरनिर्वाह,मुलांचे शिक्षण याचा मेळ बसत नाही गेल्या सहा महिन्यांचे मानधन अजून मिळालेले नाही.दिवाळी साजरी करणेही अवघड झाले आहे.याप्रश्नी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी दुपारपासून आम्ही पाटण येथे प्रांताधिकारी व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसणार आहोत.अन्य पोलिस पाटील साखळी उपोषणाने त्यास पाठींबा देतील. पंचवीस हजार मानधन वाढ करावी,दरमहा मानधन मिळावे,नूतनीकरण कायमस्वरूपी बंद करावे.सेवा निवृत्तीचे वय ६० वरून ६५वर्षे करावे.अनुकंपा तत्वावर वारसांना प्राधान्य द्यावे भविष्यनिर्वाह निधीची तरतूद करावी.नेमणूक झाल्यापासूनचा प्रवास भत्ता लवकर मिळावा.तालुक्याच्या ठिकाणी शासकीय बैठकीस जाण्यायेण्याचा प्रवास भत्ता मिळावा.पोलिस पाटील व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्य विम्याची तरतूद करावी आदी मागण्याही निवेदनात करण्यात आल्या आहेत.

___________________________________

 सदरक्षणाय खलनिग्रहणाय असं ब्रीद वाक्य असलेल्या पोलीस दलाला कायदा सुव्यवस्था सुस्थित राखण्यात खांद्याला खांदा लावून गावाखेड्यात काम करणारे पोलीस पाटील मानधनापासून वंचित आहे. सहा महिने उलटले तरी शासनाकडून त्यांना मिळणारे मानधन त्यांच्या बँक खात्यावर आलेले नाहीत. पाटील संघटना ठिकठिकाणी निवेदन देत आहे. 2012 पासून प्रवासभत्ता मिळालेला नाही. सहा महिने झाले अजूनही मानधन नाही.दिवाळी सणासुदीच्या काळात तरी मानधन मिळायला हवे होते पण ते मिळाले नाही. त्यामुळे पोलीस पाटील हे गावखेड्यात काम कसे करणार ?”

श्री.संतोष पवार -शेंडेवाडी (कुंभारगाव )
पोलीस पाटील.

___________________________________