पोलिसांच्या भरधाव गाडीनं चौघांना उडवलं, एक ठार, तीन जखमी

 


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
दारूच्या नशेत बेधुंद होऊन भरधाव वेगाने ढेबेवाडीकडे निघालेल्या ढेबेवाडी पोलीस स्टेशनच्या गाडीवरील चालकांने रविवार रात्री 10.30 ते 11 दरम्यान कुसूर (ता. कराड) येथे चौघांना उडविले त्यात एकजण जागीच ठार झाला असून एकजण गंभीर जखमी आहे, तर अन्य दोघे किरकोळ जखमी झाले आहेत.        

         याबाबत कुसूर येथे रात्री 10.30 च्या दरम्यान रयत सह.साखर कारखान्याच्या ऊस तोडणीसाठी नंदुरबार वरुन ट्रक नं.एम एच- 50 - N-7279 मधून आणलेल्या ऊसतोडणी कामगार टोळीचे कुसूर बसस्थानका जवळच कामगार व सामान उतरण्याचे काम सुरू होते तेंव्हा तिथे आपल्या मित्राबरोबर आलेला सुजय कांबळे ( रा.कोळेवाडी )हा मोटार सायकलवर (एम एच 50 - B-8377) बसलेला होता.

     त्याचवेळी कराड कडून भरधाव वेगाने आलेल्या पोलीसगाडी एम एच 11-D-6354 या गाडीने ट्रकला घासून पुढे असलेल्या मोटर सायकलला वेगात धडक दिली तेंव्हा गाडीवर बसलेला सुजय उत्तम कांबळे वय 18 हा गाडी वरून उडून पुढे 7/8 फुट लांब डांबरी रस्त्यावर फेकला गेला,व जागीच ठार झाला. तर शेजारी उभे असलेले युवराज अमरसिंग पावरा वय 28,( नंदुरबार )अजित यमगर वय 39,व विक्रम भिसे वय 30 (कुसूर) याना गाडीची धडक बसली त्यात युवराज पावरा गंभीर जखमी होऊन त्यात त्याचा हात फ्रँक्चर झाला आहे.

       सदर अपघातग्रस्त पोलीस गाडी ढेबेवाडी पोलीस ठाण्याची आहे,अपघात झाला तेंव्हा चालक म्हणून शंकर उत्तम खेतमर हे होते. ( मुळ गांव कोळेवाडी ता.कराड )अपघात झाला तेंव्हा ते नशेत असल्याने नेमके काय घडले याची खबरबात त्यांना नव्हती इतके नशेत तर्र होते,अपघातानंतर त्याला गाडीतून बाहेरही येता आले नाही.

      घटनेची माहिती कुसूरचे पोलीस पाटील प्रकाश शिणगारे यांनी कराड तालुका पोलीस स्टेशनला कळविली तेंव्हा पोलीस निरीक्षक विजय पाटील,हवालदार हजारे व संकपाळ हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले,त्यांनी मृत सुजय कांबळेंचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कराडच्या काँटेज हाँस्पिटलला पाठविला व जखमीना उपचारासाठी कराडच्या कृष्णा रूग्णालयात पाठविले,तिथेजखमीवर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

  अपघातात दुचाकीचे व पोलीस गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.चालक शंकर खेतमर दारू पिऊन नशेत गाडी चालवित होता हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यां समोरच स्पष्ट झाले.रात्री उशिरा पर्यंत कराड तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.मृत सुजल कांबळे हा कुसूरच्या श्री.स.गा.म. विद्यालयात इ.12 वीत शिकत होता.