गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आलेल्या युवकाचा अपघातात मृत्यू ; रात्री सेल्फी काढून मित्रांना पाठवला अन् पुढं ...कराड|कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
प्रवीण यशवंत कळंत्रे (वय ३२, रा. माटेकरवाडी, कुंभारगाव, ता. पाटण) असे मृत युवकाचे नाव असून, पाच दिवसांपूर्वीच ते गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आले होते. कराड तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद झाली आहे.
मुंबईहून गणपतीसाठी गावी आल्यानंतर थाटात गणपती बसवला आणि रात्री मित्रांसमवेत रिक्षातून कराड येथे गेल्यावर तेथे सर्वांनी आईस्क्रीम खाल्ले व कोल्हापूर नाक्यावर आय लव्ह कराड या सेल्फी पॉइंटवर सेल्फीही घेत मित्रांच्या ग्रुपवर पाठवली.
पुढं जाताच रस्त्याकडेच्या क्रॅशबॅरिअरला धडकून रिक्षा पलटी झाली आणि तो सेल्फी त्याचा शेवटचा ठरला. कराड- ढेबेवाडी मार्गावर कणसेमळा येथे शुक्रवारी रात्री उशिरा अपघाताची घटना घडली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून दोघेजण जखमी झाले आहे.
प्रवीण यशवंत कळंत्रे (वय 32, रा. माटेकरवाडी, कुंभारगाव, ता. पाटण) असे मृत युवकाचे नाव आहे. 5 दिवसांपूर्वीच ते गणेशोत्सवासाठी मुंबईहून गावी आले होते. 
याबाबत माहिती अशी की, पाटण तालुक्यातील कुंभारगाव विभागातील माटेकरवाडीतील चौघेजण शनिवारी रात्री रिक्षा क्रमांक (MH 43 CA 1904) सीएनजी भरण्यासाठी कराड येथे गेले होते. गॅस भरून रिक्षातून गावाकडे परतताना रात्री 11:45 वाजण्याच्या सुमारास कराड – ढेबेवाडी मार्गावरील कणसे मळा- विंगजवळ रिक्षाला अपघात झाला.
अपघातात प्रवीण कळंत्रे गंभीर जखमी झाले तर त्यांच्यासोबत असलेल्या तिघांपैकी दोघेजण जखमी झाले. ये- जा करणाऱ्यांनी वाहने थांबवून आणि स्थानिकांच्या मदतीने जखमींना कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी नेले. तेथे प्रवीण यांचा मृत्यू झाला. त्यांच्या निधनाने कुंभारगाव परिसरात शोकाकूल वातावरण आहे. दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेची नोंद कराड तालुका ग्रामीण पोलिस ठाण्यात झाली आहे.