उंब्रजला नव्या उड्डाणपुलाचे काम सुरू करा ; खा.श्रीनिवास पाटील यांची मंत्री गडकरी यांच्याकडे मागणी.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
पुणे-कागल राष्ट्रीय महामार्गावरील व कराड तालुक्यातील महत्वाचे शहर असणाऱ्या उंब्रज येथे नवा पारदर्शक उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. सध्या सुरू असलेल्या महामार्गाच्या सहा पदरीकरण कामात त्या उड्डाणपूलाचा समावेश करून त्याचे काम त्वरीत हाती घ्यावे, अशी आग्रही मागणी खा.श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. 

   दिल्ली येथे खा.श्रीनिवास पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन ही मागणी केली आहे. दरम्यान सातारा लोकसभा मतदारसंघातील अन्य प्रलंबित कामासंदर्भात चर्चा करून ती कामे देखील मार्गी लावावीत अशी विनंती त्यांनी यावेळी केली. 

    उंब्रज येथील ग्रामस्थांनी खा.श्रीनिवास पाटील यांची भेट घेऊन याठिकाणी पारदर्शक उड्डाणपूल व्हावा अशी मागणी यापूर्वी केली होती. त्यानुसार खा.पाटील यांनी त्यावेळी केंद्रीय पातळीवर पत्रव्यवहार व पाठपुरावा केला होता. याबाबत सर्व्हे करून तांत्रिक बाबी तपासल्या जात असल्याचे मंत्री नितीन गडकरी यांनी खा.पाटील यांना कळवले होते. त्याच्या पुढील कार्यवाहीसाठी खा.पाटील यांनी पुन्हा एखदा गडकरींची भेट घेऊन ही मागणी केली.

     यासंदर्भात खा.श्रीनिवास पाटील म्हणाले, एनएच ४ राष्ट्रीय महामार्गावर वसलेले उंब्रज शहर हे परिसरातील जवळपास ३० ते ४० गावांसाठी महत्वाचे व प्रमुख बाजारपेठचे ठिकाण आहे. त्याची लोकसंख्या सुमारे २५ हजार आहे. याठिकाणी अनेक शासकीय आणि खाजगी कार्यालये, बँका, पोलीस स्टेशन, पोस्ट कार्यालय, बस स्थानक आहे. या शहरातील टेलिफोन एक्सचेंज, एमएसईबी, सिटी सर्व्हे, सब रजिस्ट्रार, कृषी, धोम पाटबंधारे विभाग आदींची कार्यालये याठिकाणी आहेत. तसेच महाविद्यालय, शाळा आणि हॉस्पिटल देखील येथे आहेत. दिवसेंदिवस हे शहर झपाट्याने विकसित होत असून त्याचा विस्तार होत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा उंब्रजमधून जात असल्यामुळे हे शहर दोन भागात विभागले गेले आहे. 

    चिपळूण-पंढरपूर राज्य महामार्ग १४३ सुद्धा उंब्रज येथे राष्ट्रीय महामार्ग ओलांडतो. त्यामुळे उंब्रज हे अत्यंत रहदारीचे आणि अपघाताचे ठिकाण बनले आहे. सध्या महामार्गावर फक्त एक अंडरपास असलेला भरीव उड्डाणपूल आहे, जो अत्यंत अपुरा आणि अयोग्यरित्या स्थित आहे. पावसाळ्यात अंडरपासमध्ये पाणी साचल्याने नागरिकांची आणखी गैरसोय होते. त्यामुळे नागरिक व प्रवाशांची सुविधा आणि सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या दृष्टीकोनातून महत्वाच्या ठरणा-या राष्ट्रीय महामार्गावर अनेक अंडरपाससह पारदर्शक उड्डाणपूल बांधण्याची नितांत गरज आहे. याकडे प्राधान्याने लक्ष द्यावे. उंब्रज येथे योग्य डिझाइन केलेला उड्डाणपूल बांधण्यासाठी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांना तशा सूचना द्याव्यात आणि सध्या सुरू असलेल्या महामार्गच्या सहा पदरीकरण कामात त्याचा समावेश करावा. अशी मागणी त्यांनी केली. याविषयीचे निवेदन खा.पाटील यांनी मंत्री नितीन गडकरी यांना यावेळी दिले. 

___________________________________

नागरिकांची सुरक्षितता व वाहतूक कोंडीतून कायमची सुटका होण्यासाठी उंब्रज येथे नवीन उड्डाणपूल होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. केंद्र सरकार या कामासाठी सकारात्मक आहे.

- श्रीनिवास पाटील, खासदार

___________________________________