ज्ञानशीला क्लिनिक रुग्णांना वरदान ठरले : डॉ. राजीव थोरात

तांबवेत आता अल्प दरात आरोग्य सेवा



तांबवे : उदघाटन प्रसंगी डॉ राजीव थोरात, डॉ स्मिता मोहिले, डॉ समीना मुजावर, नयना खबाले व इतर.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
गोरगरिब, सर्वसामान्य रुग्णांना अत्यंत अल्प दरात औषधोपचार मिळावेत, दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, यासाठी तांबवे, ता. कराड येथे स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने 'ज्ञानशीला क्लिनिक' सुरु केले आहे. हे क्लिनिक रुग्णांना वरदान ठरेल, असे गौरवोद्गार डॉ. राजीव थोरात (एमडी मेडिसीन) यांनी काढले.

तांबवे येथील स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील यांच्या तृतीय पुण्यस्मरण दिनानिमित्त स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने आरोग्य क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ज्ञानशीला क्लिनिक सुरु केले आहे. ना नफा ना तोटा तत्वावर, केवळ रुग्णसेवेचा उद्देश समोर ठेवून हे क्लिनिक चालविले जाणार आहे.

क्लिनिक सेवेचा प्रारंभ डॉ. थोरात यांच्या हस्ते झाला. यावेळी डॉ. स्मिता शिंदे- मोहिले, डॉ. समिना मुजावर, संस्थेच्या अध्यक्षा नयना खबाले- पाटील,अनिल काटवटे, विकास खडंग, सविता पाटील, स्वाती शिंदे, अंकिता कदम, महेश पाटील, शिल्पा पाटील, समीर मुल्ला आदींसह मान्यवर उपस्थित होते.

डॉ. थोरात म्हणाले, समाजाप्रती, रुग्णांप्रती सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी ज्ञानशीला क्लिनिक सुरु केले आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य, गोरगरिबांना योग्य दरात दर्जेदार आरोग्य सुविधा मिळणे अत्यंत महत्वाचे आहे. या क्लिनिकमधून आमच्याकडे येणाऱ्या रुग्णांना आम्हीही सामाजिक बांधिलकी जोपासत उपचार देवू.

डॉ. स्मिता मोहिले म्हणाल्या, आमच्या वैद्यकीय ज्ञान, अनुभवाचा लाभ सर्वसामान्य, गोरगरिब रुग्णांना व्हावा, या हेतूने हे क्लिनिक सुरु केले आहे. येथे येणारा प्रत्येक रुग्ण हा आपल्या कुटुंबातील सद्स्य आहे, या भावनेतून त्याच्यावर उपचार केले जातील. हे क्लिनिक वैद्यकीय क्षेत्रात आदर्श ठरेल.

स्व. सौ. सुशीला ज्ञानदेव पाटील बहुउद्देशीय सामाजिक संस्थेने गत तीन वर्षात तांबव्यात विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत. आरोग्य सुविधा देण्यासाठी, महिला सक्षमीकरणासाठी ही संस्था सदैव प्रयत्नशील असून, या संस्थेची कामगिरी कौतुकास्पद, आदर्शवत आहे, असे गौरवोद्गार प्रदीप पाटील, धनंजय ताटे,बाळासाहेब शिंदे, रामचंद्र पाटील, शंभूराज पाटील, सागर पाटील, उत्तम राऊत आदींनी काढले. नयना खबाले यांनी प्रास्ताविक केले. ॲड. विजयसिंह पाटील यांनी आभार मानले.