कुंभारगांव विभागात गणपती बाप्पाचं जल्लोषात आगमन


कुंभारगांव | राजेंद्र पुजारी:     
गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कुंभारगांव विभगातील घरगुती व सार्वजनिक मंडळांच्या गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशमूर्ती नेण्यासाठी पहाटेपासूनच गर्दी होती. गणेशाच्या आगमनाचा उत्साह सर्वत्र ओसंडून वाहत होता. लाडक्या गणरायाचे पारंपरिक ढोल ताश्याच्या, टाळ मृदुंगाच्या गजरात, भक्तिमय वातावरणात, फटाक्यांची आतषबाजी करत जलोषात स्वागत केले. यावेळी परिसरातील विविध गणेश मंडळांनी आपल्या लाडक्या गणरायाचे जंगी मिरवणूकीने वाजत गाजत प्रतिष्ठापना केली.

गणरायाच्या स्वागतासाठी सकाळपासूनच भक्तांनी गर्दी केली होती. घरगुती गणेशमूर्ती खरेदीसाठी लहान मुलांसह महिलांनीही गर्दी केली होती. तीन वर्षानंतर प्रथमच गणेशोउत्सव निर्बंधा शिवाय साजरा होत असल्याने गेले अनेक दिवस गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेश भक्ता मध्ये कमालीचा उत्साह पाहण्यास मिळाला.

 यावेळी काही सार्वजनिक मंडळाचे 25वे व 50वे वर्ष असल्याने श्री गणेशाची पालखीतून, रथातून, वारकऱ्याच्या वेशभूषेत मृदुंगाच्या गजरात वाद्याच्या तालावर गणेश भक्तांनी बेधूंद नाचण्याचा ठेका धरला होता.  

श्री गणेश मित्र मंडळ चव्हाणवाडी - घराळवाडी , बालगणेश मित्र मंडळ शेंडेवाडी, भैरवनाथ गणेश मंडळ, बाल गणेश मंडळ चाळकेवाडी, जय हनुमान क्रिडा व सामाजिक संस्था गणेश मंडळ मान्याचीवाडी , भैरवनाथ गणेश मंडळ चाळकेवाडी या मंडळांच्या गणरायाच्या आगमन सोहळ्यात उपस्थित मान्यवरांनी दै.कृष्णाकाठच्या आरती संग्रहाचे प्रकाशन केले व शुभेच्छा दिल्या.