सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तीन दिवसांनी पूर्ववत.


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून खटाव तालुक्यातील पुसेसावळी गावात दंगल  उसळल्यानंतर सातारा जिल्ह्यातील इंटरनेट सेवा गेली तीन दिवस बंद करण्यात आली होती. आता दंगलग्रस्त भागातील तणाव निवळला असून बाजारपेठेसह सर्व व्यवहार आजपासून पूर्ववत झाले आहेत. त्यामुळे इंटरनेट सेवाही पुन्हा सुरू करण्यात आली. तर अफवांवर विश्वास न ठेवता सलोखा राखण्याचे आवाहन प्रशासनाने केलं आहे.

कारवाईच्या आश्वासनामुळे बंद मागे : पुसेसावळी दंगलीमध्ये जे कोणी दोषी आढळतील, त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल, असे प्रशासनाने आश्वस्त केल्यानंतर पुसेसावळी गावातील बंद मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे रविवारपासून ठप्प असलेले व्यवहार पुन्हा सुरू झाले आहेत. दंगल झालेल्या पुसेसावळी गावात पोलीस बंदोबस्त मात्र कायम ठेवण्यात आला आहे. सोशल मीडियावर सायबर सेलचे लक्ष असून सामाजिक शांतता धोक्यात येईल, अशा पोस्ट कोणीही टाकू नयेत, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.


कराड शहरातही बंदोबस्त तैनात : कराड शहरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. गोपनीय विभागही हालचालींवर लक्ष ठेऊन आहे. वरिष्ठ अधिकारी सातत्याने सर्व जाती-धर्मातील प्रतिष्ठीतांच्या बैठका घेऊन सामाजिक सलोखा आणि शहरातील शांतता अबाधित राखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर राखीव दलाच्या तुकड्याही कराडमध्ये दाखल झाल्या आहेत.