आजीच्या प्रसंगावधानाने वाचले बाळाचे प्राण
पाटण तालुक्यातील कुंभारगाव शेंडेवाडी येथे झोपी गेलेल्या दोन वर्षांच्या बाळा शेजारी कोब्रा जातीचा विषारी नाग फडा काढुन बसलेला दिसताच आजीच्या काळजाचा ठोका चुकला. मात्र आजीच्या प्रसंगावधानाने लहान बाळाचे प्राण वाचले.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाटण तालुक्यातील कुंभारगाव- शेंडेवाडी गावचे सरपंच राहुल मोरे यांच्या जुन्या घरी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास 'कोब्रा' जातीचा विषारी नाग आढळून आला. सरपंच राहुल मोरे हे आपल्या दोन वर्षांच्या मुलाला घेऊन आजीकडे जुन्या घरात गेले होते. मुलाला आजीसोबत सोडून राहुल मोरे हे शेतीच्या कामासाठी शेतात निघून गेले. त्यानंतर आजीने बाळाला जमिनीवर अंथरुण टाकून त्यावर झोपवले. आजी त्याच्याशेजारीच बसली होती. दरम्यान, दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास आजीचे लक्ष गेले असता बाळाशेजारीच विषारी नाग फणा काढून बसल्याचे त्यांना दिसले.
हा प्रकार पाहताच आजी घाबरली. मात्र प्रसंगावधान राखत आजीने मुलाचे अंथरूण आपल्याजवळ ओढले. अचानक झालेल्या या हालचालीमुळे साप गोंधळला. तो घरातच आडोशाला गेला. आजींनी आरडाओरडा केल्यानंतर ग्रामस्थ त्या ठिकाणी धावले. त्यांनी याबाबतची माहिती सरपंच राहुल मोरे यांना फोनवरून दिली. त्यानंतर राहुल मोरेही तातडीने त्या ठिकाणी धावले. त्यांनी सर्पमित्र बापू मोरे यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले. बापू मोरे यांनी त्या ठिकाणी जाऊन नागाला सुरक्षित पकडले. तसेच त्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिले.
कुंभारगाव विभागात सर्पमित्र बापू मोरे हे अनेक दिवसांपासून साप पकडून त्यांना सुरक्षित ठिकाणी जंगलात सोडतात.