अब दिल्ली दूर नही! दिल्लीला जाणारी रेल्वे आता सातारा व कराडला थांबणार.

खा. श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नांना यश



कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस मिरजेतून प्रत्येक रविवारी धावणार आहे. मात्र, या गाडीला सातारा व कराड येथे थांबा नसल्यामुळे सातारा जिल्ह्यातील प्रवाशांना मिरज किंवा पुणे रेल्वे स्थानकावर जावे लागत होते. त्यामुळे त्यांची मोठी गैरसोय होत होती. त्यानंतर हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस सुरुवातीला मिरज पर्यंत विस्तारित करण्यात आली होती. 

त्यानंतर ही गाडी सातारा, कराड येथे थांबावी ,अशी मागणी विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समितीचे सदस्य गोपाळ तिवारी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा. श्रीनिवास पाटील यांच्याकडे केली होती. 

त्यांच्या मागणीची दखल घेऊन खा.श्रीनिवास पाटील यांनी संबंधित रेल्वे गाडी कराड आणि सातारा येथील रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात यावी, अशी विनंती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे केली. आणि दोघांनीही हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस रेल्वे आता सातारा आणि कराड रेल्वे स्टेशनवर थांबविण्याचे आदेश दिले.

हजरत निजामुद्दीन-मिरज दर्शन एक्स्प्रेस ही गाडी प्रत्येक रविवारी सकाळी ६:०२ वाजता कराड रेल्वे स्टेशनवरून सुटून सातारा, जेजुरी, पुणे, लोणावळा, कल्याण (मुंबई), वसई रोड (मुंबई), वापी, सुरत, वडोदरा, रतलाम, कोटा येथे थांबून दिल्लीच्या निजामुद्दीन स्टेशनला दुसऱ्या दिवशी सकाळी ६:४५ वाजता पोहोचते. तर परतीच्या प्रवासात ही गाडी दिल्लीच्या निजामुद्दीन रेल्वे स्टेशनवरून प्रत्येक शुक्रवारी रात्री ९:४० वाजता सुटून कराड रेल्वे स्टेशनला शनिवारी रात्री १०:३७ वाजता दाखल होते.

या रेल्वे गाडीशिवाय चंदीगढ-यशवंतपूर संपर्क क्रांती, निजामुद्दीन-यशवंतपूर संपर्क क्रांती तसेच कोल्हापूर-अहमदाबाद व बेंगलोर-जोधपुर या रेल्वे गाड्यांना देखील कराड व सातारा येथे थांबा देण्याची मागणी खा. श्रीनिवास पाटील यांच्या वतीने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव व राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे करण्यात आली आहे. दरम्यान, हजरत निजामुद्दीन ते मिरज एक्सप्रेस रेल्वे आता सातारा व कराड रेल्वे स्टेशनवर थांबणार असल्यामुळे गुजरात, राजस्थान आणि दिल्ली बरोबरच सातारा जिल्ह्यातील प्रवाशांनासुद्धा आता तीन राज्यांत रेल्वेद्वारे प्रवास करता येणार आहे.