भाजपकडून शरद पवारांना 'या' दोन मोठ्या पदांच्या ऑफर" पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट











कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा
महाराष्ट्र आणि देशाच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी एक बातमी आहे. अजित पवार यांच्या गटाला भाजपने आपल्यासोबत घेतले. अजित पवार आल्यानंतर शरद पवारही आपल्यासोबत येतील असं भाजपला वाटत होतं. पण शरद पवार यांनी भाजपसोबत जाण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. त्यामुळे आता भाजपने पुढचा डाव टाकला आहे. भाजपने शरद पवार यांना दोन मोठ्या पदांची ऑफर दिली आहे. अजित पवार यांच्या माध्यमातून या दोन ऑफर्स देण्यात आल्या आहेत. भाजपच्या या खेळीमुळे संपूर्ण राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या शरद पवार यांच्यासोबत ज्या भेटीगाठी वाढल्या आहेत, त्यामागे या ऑफर्सवरील चर्चा असल्याचंही सांगितलं जात आहे.

माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार यांना भाजपकडून देण्यात आलेल्या ऑफर्सवर खुलासा केला आहे. तसं वृत्तच फ्रि प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्राने दिलं आहे. भाजपकडून शरद पवार यांना केंद्रीय कृषी मंत्रीपद आणि नीती आयोगाच्या अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली आहे. माझ्या माहितीनुसार, शरद पवार यांनी अजितदादांनी दिलेली ही ऑफर नाकारली आहे, असा गौप्यस्फोट पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. पुण्यातील उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत शरद पवार यांना ही ऑफर देण्यात आली होती. त्यावेळी जयंत पाटीलही उपस्थित होते, असं सांगण्यात आलं.

सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांनाही ऑफर ?
पृथ्वीराज चव्हाण यांनी या ऑफरवर आणखी माहिती दिली आहे. जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांनाही सत्तेत सामावून घेण्याची ऑफर देण्यात आली आहे. अजितदादा हे नुकतेच दिल्लीत गेले होते. त्यावेळी त्यांनी दिल्लीतील नेत्यांची भेट घेतली. या नेत्यांनी अजितदादांना शरद पवार यांना हा प्रस्ताव सांगण्यास सांगितलं असल्याचं समजतं.