आ. पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते मलकापूर लक्ष्मीनगर येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्राचा (UPHC) शुभारंभ


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा : मलकापूर नगरपरिषद कार्यक्षेत्रामधील लक्ष्मीनगर या ठिकाणी सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत आयुष्यमान भारत योजनेमधून नागरी आरोग्य केंद्राचा उद्घाटन समारंभ आ. पृथ्वीराज चव्हाण (बाबा), माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य व आ.सतेज उर्फ बंटी पाटीलसो यांचे शुभहस्ते करण्यात आला. यावेळी मा.आ.मोहनराव कदम, सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य मतदार संघ, उदयसिंह पाटील, सरचिटणीस- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, सौ.निलम येडगे, नगराध्यक्षा- मलकापूर नगरपरिषद, श्री.विजय पवार, तहसिलदार कराड, तालुका वैद्यकिय अधिकारी डॉ.सुनिल चव्हाण, अर्बन कुटूंब प्रमुख श्री.सुभाषराव जोशी, माजी पंचायत समिती उपसभापती श्री.आनंदराव सुतार व मुख्याधिकारी श्री.राहुल मर्ढेकर हे उपस्थित होते. सदर उद्घाटन प्रसंगी आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांनी आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये आठवड्यातून 1 वेळा मानसोपचार तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, गरोदर महिलांसाठी स्त्री रोग तज्ञ यांचेसाठी राखीव वेळ असावी अशी सुचना केली.  मलकापूर शहराची सद्याची लोकसंख्या 40000 पेक्षा जास्त असून, मलकापूर शहर राष्ट्रीय महामार्ग क्र.4 च्या दुतर्फा वसलेले आहे. पुर्वी मलकापूर ग्रामपंचायतीची एप्रिल 2008 रोजी नगरपंचायत होवून सप्टेंबर 2018 साली नगरपंचायतीस नगरपरिषदेचा दर्जा प्राप्त झालेला आहे. नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सार्वजनिक आरोग्य सेवेकरीता सातारा जिल्हा परिषद आरोग्य विभागअंतर्गत काले प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून आरोग्य सुविधा उपलब्ध होत होत्या. याकरीता आगाशिवनगर झोपडपट्टी या ठिकाणी उपकेंद्र सुरु करण्यात आलेले आहे. तथापि, शहराची वाढत्या लोकसंख्येचा विचार करता उपकेंद्रामध्ये असणारा कर्मचारी वर्ग याचा विचार करता शहरासाठी स्वतंत्र नागरी आरोग्य केंद्र आवश्यक असलेने नगरपरिषदेने शहराचे पुर्व-पश्चिम भागाकरीता 2 नागरी आरोग्यवर्धिनी सुविधा केंद्रांची मागणी मा.आमदार पृथ्वीराज चव्हाण (बाबा) यांचे शिफारशीने शासनाकडे केली होती. 

 तत्कालिन आरोग्य विभागाचे कुटूंब कल्याण आयुक्त मा.एन. रामास्वामी यांनी मलकापूर शहराची आरोग्य सेवेविषयी असणारी कमतरता विचारात घेता आगाशिवनगर व लक्ष्मीनगर या विभागांमध्ये नवीन नागरी आरोग्य सेवा केंद्र मंजूर केली आहेत. सदर आरोग्य केंद्रामध्ये शहरातील गरीब-गरजु आर्थिक दृष्ट्या दुर्बल व सर्वसामान्य नागरिकांसाठी 100% मोफत तपासणी व औषधोपचार केला जाणार आहे. या आरोग्य केंद्रामध्ये डेंग्यू मलेरिया, हिवताप, रक्तदाब, रक्तातील साखर या तपासण्या मोफत होणार असून, याकरीता एम.बी.बी.एस. दर्जाचे डॉक्टर, परिचारीका, औषध निर्माता व रक्त लघवी तपासणी मदतनीस, शिपाई असा कर्मचारी वर्ग नियुक्त केला असल्याने नागरिकांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे. सदर आरोग्यवर्धिनी केंद्राची वेळ सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.30 अशी राहणार आहे. 

 मलकापूर नगरपरिषदेने सुरु ठेवलेल्या श्रीमती प्रेमलाताई चव्हाण कन्यासुरक्षा अभियान 11व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून या नागरी आरोग्य केंद्राचा उद्घाटन समारंभ आयोजित करण्यात आलेला आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मोफत स्वरुपात तपासणी व औषधोपचार मिळत असलेने नागरिकांच्यामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे. तसेच सध्या सुरु असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील उड्डाणपुलाचे कामामुळे वयोवृध्द व महिलांना महामार्ग ओलांडणेस धोकादायक असलेने आगाशिवनगर व लक्ष्मीनगर येथे नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु झाल्याने त्यांना याचा फायदा मोठ्या प्रमाणात होत आहे. सदरचे आरोग्य केंद्र सुरु केले असल्यामुळे नागरिकांच्यामधून नगरपरिषदेचे आभार व्यक्त करण्यात येत आहेत. 

 यावेळी उपनगराध्यक्ष श्री.मनोहर शिंदे यांनी शहरातील नागरिकांनी लक्ष्मीनगर प्रमाणेच आगाशिवनगर जिल्हा परिषद कॉलनी या ठिकाणी सुध्दा नागरी आरोग्यवर्धिनी केंद्र सुरु करणेत आले असून, या आरोग्यवर्धिनी केंद्रातील आरोग्य सुविधांचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन केले. या प्रसंगी नगरपरिषदेचे बांधकाम सभापती श्री.राजेंद्र यादव, शिक्षण, सभापती, नियोजन व विकास समिती श्री.प्रशांत चांदे, सभापती, महिला व बालकल्याण समिती सौ.कमल कुराडे, उपसभापती सौ.नंदा भोसले, लक्ष्मीदेवी विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक, श्री.गजानन नागरी पतसंस्थेचे चेअरमन श्री.वसंतराव शिंदे व व्हाईस चेअरमन श्री.भागवत शिंदे, लक्ष्मीनगर येथील नागरिक श्री.आबासो शिंदे, श्री.अर्जुन जगदाळे, श्री.प्रकाश पवार, श्री.बाळासो बागल, श्री.प्रविण खोत, श्री.चंद्रकांत बागल, श्री.मारुती शिंदे, श्री.अल्लाउद्दीन मुल्ला, श्री.दिलीप बागल, श्री.बाळासो जगदाळे, श्री.गणपतराव जगदाळे आदि नागरीक उपस्थित होते.