इर्शाळवाडीच्या मदतीसाठी सरसावतोय कुंचला


तळमावले | कृष्णाकाठ वृत्तसेवा :
रायगड जिल्हयातील खालापूरजवळील इर्शाळवाडी या गावावर दरड कोसळून संपूर्ण गाव ढिगाऱ्याखाली गाडले गेले आहे. इर्शाळवाडी ग्रामस्थांच्या मदतीसाठी व पुनर्वसनासाठी पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील संवेदनशील कलावंत डाॅ.संदीप डाकवे यांनी अक्षरगणेशा उपक्रम राबवला आहे. इर्शाळवाडीच्या दुःखावर मायेची फुंकर घालण्यासाठी डाॅ.डाकवे यांचा कुंचला सरसावला आहे

या उपक्रमांतर्गत आपल्याला हव्या असलेल्या नावात अक्षरगणेशा डाॅ.डाकवे यांच्याकडून रेखाटून घ्यायचा आणि त्या बदल्यात आपण त्यांना कलाकृतीने मुल्य रु. 1,000/- च्या वरती कितीही आपल्या इच्छेनूसार द्यायचे. अक्षरगणेशांना मिळणारे मुल्य थेट इर्शाळवाडीच्या आपत्तीग्रस्तांना देण्यात येणार आहे.

या उपक्रमात सहभागी होणाऱ्यांना अक्षरगणेशा आणि डिजिटल कृतज्ञता प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यामुळे सदर अक्षरगणेशा आपल्याकडे संग्रही राहिलच परंतू आपण रेखाटून घेतलेल्या कलाकृतीचे मुल्य आपत्तीग्रस्त बांधवाना मदतीचा हात दिल्याचे आत्मिक समाधान कायम आपणास देत राहील हे नक्की.

डाॅ.संदीप डाकवे यांनी यापूर्वी अक्षरगणेशा व कलेच्या माध्यमातून सुमारे एक लाखापर्यंत रोख स्वरुपात आर्थिक मदत तसेच एक लाखाहून जास्त किमतीचे शैक्षणिक साहित्य विविध शाळांना दिले आहे. अर्थात हे सर्व लोकसहभागातून केले असल्याचे त्यांचे प्रांजळ मत आहे.स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबवलेला हा उपक्रम गुरुवार दि.28 सप्टेंबर, 2023 अनंतचतुर्दशी अखेर चालणार आहे.

नेहमीच नावीण्यपूर्ण उपक्रम राबवून समाजाप्रती आपले दायित्व निभावण्याचा डाॅ.डाकवे प्रयत्न करत असतात. संदीप डाकवे हे 18 वर्षा पासून अक्षरगणेशा रेखाटत असून अक्षरगणेशातून मदत केलेल्या उपक्रमाचे हे 7 वे वर्ष आहे.

या उपक्रमासाठी स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट, बॅंक ऑफ महाराष्ट्र, खाते क्रमांक 60370976232 आयएफएससी कोड एमएएचबी 0001050 या खात्यात किंवा 9764061633 या क्रमांकावर गुगल पे किंवा फोन पे व्दारे जमा करायचे आहेत.

श्रीरामाने सेतु बांधताना खारुताईनेही सेतुमध्ये चिमुट चिमुट माती टाकल्याचा उल्लेख रामायणात आढळतो. आज आपत्तीग्रस्तांना अशाच मदतीची गरज आहे. एक कलावंत म्हणून मी कलेच्या माध्यमातून असे अक्षरगणेशरुपी योगदान देवू शकतो. या प्रयत्नांना समाजाचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.