या दिवशी एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा


मुंबई|कृष्णाकाठ वृत्तसेवा:
अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाल्यापासून एक चर्चा सातत्याने सुरु आहे ती म्हणजे एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवार यांना मुख्यमंत्री केलं जाईल. दुसरीकडे अनेक आमदार हा दावा खोडूनही काढत आहेत. मात्र आता महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तारीख सांगत एकनाथ शिंदे यांना हटवलं जाईल आणि अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल असा दावा केला आहे.

 काय म्हणाले आ.पृथ्वीराज चव्हाण?

“लोकसभा निवडणुकीचा विचार केला तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा ही निवडणूक लढवणार नाही. कारण त्यांचा प्रभाव ठाण्याबाहेर ते फारसा सिद्ध करु शकलेले नाहीत. भाजपाकडे आता पर्याय उरला आहे तो अजित पवारांचा. त्यामुळे एकनाथ शिंदेंना हटवून अजित पवारांना मुख्यमंत्री केलं जाईल. १० ऑगस्टच्या दरम्यान एकनाथ शिंदेंबाबत एक निर्णय येईल त्यानंतर अजित पवार हे मुख्यमंत्री होतील.” असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राष्ट्रवादीत कोण कुठल्या बाजूला तेच कळत नाही ?

सध्या परिस्थिती अशी आहे की राष्ट्रवादीत कोण कुठल्या बाजूला आहे काहीच कळत नाही. नऊ मंत्र्यांच्या विरोधात राष्ट्रवादीने निलंबनाची नोटीस दिली आहे. मात्र नोटीसविषयी मूळ राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्याविषयी काही करताना दिसत नाही. अध्यक्षांना काही घाई नाही. त्यामुळे तो निर्णय इतक्यात येईल असं वाटत नाही. अजित पवारांनी पक्षांतर केलंय, जनतेच्या समोर केलं आहे. त्यामुळे पक्षांतर बंदी कायदा किती कुचकामी आहे हे समोरच आपण पाहात आहोत असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

मी राजकीय विश्लेषक म्हणून बोललो होतो. मला काही माहिती मिळाली. ती कुठून मिळाली ते मी सांगणार नाही. पण भाजपाच्या ज्येष्ठ नेतृत्वाने अतिशय महत्त्वाची लोकसभा निवडणूक आहे, त्याविषयी काही आकलन केलं आहे. या निवडणुकीमुळे मोदी सत्तेत राहणार की नाही हे ठरणार आहे. एकनाथ शिंदे हे ठाण्याच्या बाहेर प्रभाव पाडू शकले नाहीत. त्यांच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुकीला सामोरं जाता येणार नाही. त्यामुळे अजित पवारांना आपण सामावून घेतलंच आहे तर त्यांनाच जबाबदारी द्यावी असा निर्णय झाला आहे. 

१० ऑगस्टपर्यंत हा निर्णय येईल. कदाचित त्याच्या आधीही येऊ शकतो. असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.