चला, उठा आपण सर्वजण मिळून डेंगूची साथ आटोक्यात आणूया : अशोकराव थोरात


कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
सध्या मलकापूर व पंचक्रोशीमध्ये डेंगू तापाची साथ उद्भवली आहे अनेक रुग्ण किरकोळ उपचार घेत आहेत. काही रुग्ण दवाखान्यात ऍडमिट झाले आहेत. अनेक गरीब रुग्णांना डेंगू उपचाराचा खर्च परवडणारा नाही. अशावेळी नगरपरिषद मलकापूर तसेच परिसरातील ग्रामपंचायतीनी डेंगूच्या रुग्णांना औषधोपचार उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.तसेे डेंगूची साथ पसरू नये म्हणून त्वरित उपाययोजना सुरू करणे गरजेचे आहे. 

          सर्वप्रथम सध्याच्या दमट वातावरणात तयार होणारे डास व डेंगूचे डास निर्मूलनाची मोहीम हाती घेणे गरजेचे आहे. नगरपरिषदेने जिल्हा आरोग्य यंत्रणेला माहिती देऊन त्यांच्याकडून मदत घेतली पाहिजे. उपजिल्हा रुग्णालय कराड व प्राथमिक आरोग्य केंद्रामधून डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून दिली पाहिजे. डेंगू होऊ नये व झाल्यानंतर काय काळजी घ्यावी याचे प्रबोधन नगरपरिषदेने पत्रके छापून घेऊन कर्मचाऱ्यांना घरोघरी पाठवून केले पाहिजे.

अनेक वेळा नागरिकही बेजजबाबदार वागतात. डेंगूचे डास निर्माण होणारी ठिकाणे स्वच्छ करण्याची काळजी नागरिकांनीही केली पाहिजे. मलकापूरमधील भुयारी गटार योजनेचे अनेक चेंबर्समधून उघड्यावर पाणी वाहते. पावसाचे पडणारे पाणी गटरमध्ये तुंबून राहते. त्यामुळे डेंगू व मलेरियाचे डास निर्माण होतात. नगरपरिषद मलकापूर व त्यांचे अधिकारी कर्मचारी हे साथ रोग येऊ नये, म्हणून काम करत आहेत, मात्र त्याचा वेग वाढवला पाहिजे.आम्ही आमच्या शाळा महाविद्यालयांमधून डेंगू, मलेरिया होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांचे प्रबोधन सुरू केले असून प्रबोधनातून पालकांपर्यंत माहिती पोहोचवण्याचे काम करीत आहोत.