अजित पवारांनी बंड केल्याचं शरद पवारांकडून मान्य, म्हणाले...


मुंबई | कृष्णाकाठ वृत्तसेवा 
राष्ट्रवादीच्या आमदारांना सोबत घेत अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकला असू घड्याळाच्या चिन्हावरच निवडणुका घेणार असल्याचं सांगितलं. एकंदिरत अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा ठोकल्यासारखंच आहे. यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले शरद पवार?

दोन दिवसांपूर्वी देशाच्या पंतप्रधानांनी एक वक्तव्य केलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल त्यांच्या विधानात त्यांनी दोन गोष्टी सांगितल्या की राष्ट्रवादी पक्ष भ्रष्टाचारात सापडलेला पक्ष आहे. त्याबरोबर सिंचनशी संबंधित काही तक्रार होती त्याबाबत उल्लेख केला. हा जो उल्लेख त्यांनी केला आणि राष्ट्रवादी पक्ष या भ्रष्टाचारात सहभागी आहे, असा उल्लेख केला. मला आनंद आहे की, आज मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या काही सहकाऱ्यांना त्यांनी शपथ दिली. याचा मला आनंद असल्याचं शरद पवार म्हणाले.

माझं स्वच्छ मत असं आहे की, पक्षातील विधीमंडळाचे काही सदस्य यांनी कितपत वेगळी भूमिका घेतली या संबंधिचं चित्र आणखी दोन-तीन दिवसात लोकांसमोर येईल. याचं कारण ज्यांची नावं आली त्यातील काही लोकांनी माझ्याशी आजच संपर्क साधून आम्हाला या ठिकाणी निमंत्रित केलं आणि आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी आहे आणि ती कायम आहे, याचा खुलासा त्यांनी केलेला आहे. पण याबाबतीत मी आताच काही बोलू इच्छित नाही. कारण याचं स्वच्छ चित्र माझ्या इतकंच त्यांनी जनतेच्या समोर मांडण्याची गरज आहे. ते त्यांनी मांडलं तर त्याबाबत वाद नसेल. मांडलं नाही तर त्यांनी वेगळी भूमिका घेतली असा निष्कर्ष मी काढणार असल्यांच पवार म्हणाले.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...

ईडीच्या चौकशीमुळे काही आमदार अस्वस्थ होते. मोदींच्या वक्तव्यानंतर त्यांची अस्वस्थता आणखी वाढली. 

देशातील सर्व महत्वाच्या नेत्यांचे फोन आले. उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवर चर्चा झाली. 

शपथविधी समारंभात अनेकांचे चेहरे चिंताजनक होते.

पक्ष फुटला असे मी कधीच म्हणणार नाही

आम्ही न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार आहोत. 

तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर कारवाई करणार

राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांच्या राजकीय भविष्याची काळजी

महाविकास आघाडी एकत्र काम करणार 

जे घडले त्याची चिंता नाही.