मुले घडवण्याचा पाया म्हणजे प्राथमिक शाळा, चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात : पालकमंत्री शंभूराज देसाई


सातारा | कृष्णाकाठ वृत्तसेवा: 
मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.

    जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, नितीन धायगुडे आदी उपस्थित होते.

   निधी खर्चाच्या बाबतीत बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज होती असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शाळा चांगल्या करणे गरजेचे आहे. शाळांसाठी चांगला निधी दिला जाईल. आपल्या शाळा आदर्श करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनीही सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी लोकांमध्ये या विषयी माहिती द्यावी. आजच्या या कार्यक्रमात पहिल्या टप्यात ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले.

        मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, हा एक चांगला उपक्रम असून यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्याने काम करावे. आदर्श शाळे सोबतच आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र ही जिल्ह्यात उभारण्यात यावीत. खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर त्यांचा विकास करावा. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात जिल्हा अग्रेसर बनवूया. ग्रामीण जनतेला सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या प्रत्येक कामात शासन आपल्या सोबत असल्याचेही ते म्हणाले.

यावेळी खासदार श्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा आदर्श शाळा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींना आवाहन करावे. सर्वांनी एकत्र काम करून हा उपक्रम राबवूया.

    जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. आदर्श शाळांमध्ये संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, किचन गार्डन या सुविधा असणार आहेत. त्यासह संरक्षक भिंत, क्रीडांगण, सौर ऊर्जा यांचाही अंतर्भाव असणार आहे. मुलांच्या कौशल्य विकासासोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडेही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

   प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. तसेच शाळांमध्ये ई लर्निग स्टुडिओ उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

   कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांनी केले. यावेळी ई लर्निग व ई कामवाटप यांचाही शुभारंभ करण्यात आला.

    यावेळी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आदर्श शाळा उपक्रम सुरू करण्यात आलेल्या ५० गावांमधील सरपंच, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.