चिमुरडीवर बलात्कार प्रकरणी रुवले गावातील नराधमास अखेर फाशीची शिक्षा. कराड न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल.


ढेबेवाडी | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
चॉकलेटचे अमिष दाखवून आठ वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून केल्याप्रकरणी आरोपीस फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. कराड येथील विशेष अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश के. एस. होरे यांनी शुक्रवारी ही शिक्षा सुनावली. संतोष चंद्रू थोरात (वय 41, रा. रूवले, ता. पाटण) असे फाशीची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. सरकार पक्षाचे वकील ऍड. राजेंद्र सी. शहा यांनी केलेला युक्तिवाद आणि ढेबेवाडी पोलिसांनी पुराव्यासह सादर केलेले दोषारापत्र ग्राहय़ मानून न्यायालयाने निकाल दिला. पश्चिम महाराष्ट्रात गेल्या 40 वर्षात प्रथमच न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

पश्चिम महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदाच फाशीची शिक्षा लागल्याने बाललैंगिक अत्याचार कायदा आणि न्यायालयावरचा विश्वास अधिक दृढ झाल्याचे मत सरकारी वकील राजेंद्र सी. शहा यांनी ‘तरूण भारत’शी बोलताना व्यक्त केले. सरकारी वकीलांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संतोष थोरात हा 29 डिसेंबर 2021 रोजी त्यांच्या गावातील एका अल्पवयीन मुलीला व तिच्या मैत्रिणीला शेतात घेऊन गेला होता. शेतातून परत आल्यावर त्या दोन्ही मुली आरोपी थोरात याच्या घराच्याबाहेर खेळत होत्या. काही वेळानंतर पीडित मुलीची मैत्रिण घरी निघून गेली. पीडित आठ वर्षीय मुलगी एकटी असल्याची संधी साधून आरोपीने तिला चॉकलेटचे आमिष दाखवत रूवले गावातील निर्जनस्थळी नेले. तिच्यावर तिथे जबरदस्तीने बलात्कार करत तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह दरीत फेकून दिला. हा प्रकार समोर आल्यावर पोलिसांनी तपास करत संशयिताला अटक केली. ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष पवार यांनी तपास करत दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील राजेंद्र शहा यांनी युक्तिवाद केला.