वृक्षतोडीमुळे डोंगर जमीन भुसभुशीत सुरक्षेचा प्रश्न गंभीर.
शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे व वेगाच्या वाऱ्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. दुसरीकडे पवनचक्की व वृक्षतोडीसाठी अनेक ठिकाणी डोंगर पोखरले असून जमीन भुसभुशीत झाली आहे. साहजिकच त्याचा धोका अधिक वाढला आहे. डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांचा व वाडीवस्तींचा सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. पाच ते सात वर्षांपूर्वी माळीण गावावर डोंगरकडा कोसळल्याने संपूर्ण गाव गाडले गेले होते. तशीच घटना बुधवारी मध्यरात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी येथे घडली आहे. त्यात संपूर्ण वाडी गाडली गेली आहे. दरम्यान अशा प्रकारच्या घटना शिराळा तालुक्यातील अनेक गावात घडण्याची स्थिती असल्याने भीतीचे वातावरण तयार झाले आहे. प्रशासनाने वेळीच दखल घ्यावी अशी मागणी जोर धरत आहे.
तालुक्यातील अनेक गावे व वाड्या डोंगर पायथ्याशी वसलेल्या आहेत. अशातच पवनचक्क्यासाठी अनेक डोंगर पोखरले आहेत. काही ठिकाणी मुरूम मातीसाठी उत्खनन केले आहे तर काही ठिकाणी अजूनही ते सुरू आहे. त्याकडे प्रशासनाने कानाडोळा केला आहे. अशा तक्रारी आहेत. डोंगरालगत दुरंदेवाडी, जाधववाडी, खिरवडे, शिंदेवाडी, पावलेवाडी ही गावे आहेत. तर कोंडाईवाडी, बेलदारवाडी,धामवडे,, आंबेवाडी, मादळगाव,शिरसी, काळुंद्रे, शेडगेवाडी, वाकाईवाडी, किनरेवाडी,कदमवाडी, कुसळेवाडी, चरण, मोहरे, करुंगली, येसलेवाडी, भास्टेवाडी, बेर्डेवाडी, आरळा, सोनवडे, जांभळेवाडी, चिंचोली, उंबरवाडी, कुसळेवाडी, बेलेवाडी, शिरसटवाडी, मेनी, गावठाण आदि गावे डोंगरापासून पाचशे मीटर अंतरावर आहेत. या गावांना पूर्वीच सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
एकीकडे प्रशासनाने सूचना दिल्या असल्या तरी आजही तालुक्यात मोठ्या प्रमाणात डोंगरात उत्खनन सुरू आहे. मुरूम व मातीसाठी पोकलेन जेसीबीचा वापर सुरू आहे. पवनचक्क्या उभारणीसाठी ब्लास्टिंग करून खड्डे खोदले आहेत. त्यामुळे डोंगराला तडे गेले आहेत.
काही वर्षांपूर्वी शिराळा तालुक्यातील डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावांचे सर्वेक्षण करून तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना प्रशासनाला दिल्या होत्या. तसेच गावांची योग्य ती खबरदारी घेऊन त्या अनुषंगाने उपाययोजना करण्यासाठी सर्वेक्षण करण्याच्या सूचना माजी आमदार शिवाजीराव नाईक यांनी दिल्या होत्या. पण त्या कामाकडे अद्यापही दुर्लक्ष झाले आहे. यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था आहे. इर्शाळवाडी सारखी घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का असा प्रश्न समोर येत आहे.