श्री मळाई देवी पतसंस्थेचा 226 कोटींचा संमिश्र व्यवसाय : शेतीमित्र अशोकराव थोरात.
कराड | कृष्णाकाठ वृत्तसेवा: श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेची 37 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. नोटीस वाचन श्री सर्जेराव शिंदे व अनिल पवार यांनी केले, त्यामध्ये सर्व विषय एकमताने मंजूर झाले.
श्री मळाईदेवी नागरी सहकारी पतसंस्थेने 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात 226 कोटी रुपये चे व्यवसाय उद्दिष्ट पूर्ण केले आहे. संस्थेत सन 2022- 2023 या आर्थिक वर्षात रक्कम रुपये 2 कोटीचा तरतुदी पूर्वीचा नफा झालेला आहे. व्यवसाय वाढीच्या दृष्टीने भविष्यातही संस्थेची क्षमता व स्थैर्य असेच भक्कम राहण्यासाठी संस्थेने एन.पी.ए.ची 100 टक्के तरतूद केलेली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी संस्था सभासदांना 10 टक्के लाभांश देणार आहे. असे संस्थेचे चेअरमन मा. अजित थोरात ( काका) यांनी आपल्या भाषणात सांगितले. त्याचबरोबर सर्व शाखांमधून लॉकर सुविधा तसेच संस्थेच्या ठेवी 150 कोटी करणेचा मानस मा. चेअरमन यांनी व्यक्त केला.
मा. चेअरमन यांनी संस्थेच्या स्थापनेपासूनचा आढावा देताना सांगितले की, श्री मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेची स्थापना संस्थेचे संस्थापक शेती मित्र अशोकराव थोरात भाऊ यांनी दिनांक 21 जुलै 1987 रोजी केली.संस्था स्थापन करीत असताना डोळ्यापुढे एक सामाजिक उद्दिष्ट होते. त्या काळात गरीब शेतकरी, शेतमजूर, लघुउद्योजक, रिक्षा व्यवसायिक यांची बँकांमध्ये पत नसल्याने त्यांना आवश्यक ते अर्थसाहाय्य मिळत नव्हते, त्यांची बाजारात पत नाही अशा लोकांची पत निर्माण करणे हा उद्देश डोळ्यापुढे ठेवून संस्थेच्या कामकाजास सुरुवात झाली. संस्थेचा सुरुवातीचा कारभार फक्त एका शाखेतून केला जात होता, पण काळाची गरज ओळखून सन. 1996 पासून संस्थेने शाखा विस्तार करण्याचे ठरविले व त्याप्रमाणे वाटचाल करून आज संस्थेच्या 19 शाखा व मुख्य कार्यालय अशा 20 शाखांमधून सर्वसामान्य नागरिकांना बँकिंग सुविधा पुरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे.त्याचबरोबर 8 शाखांमधून लॉकर सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सन 1987 साली लावलेल्या रोपट्याचा आज वटवृक्ष झालेला आपणास पाहावयास मिळत आहे.आज अखेर संस्थेचे 8257 सभासद असून दि. 31 मार्च 2023 अखेर संस्थेकडे 133 कोटी ठेवी आहेत. तसेच संस्थेने गरजू लोकांना 93 कोटी रुपयांचे कर्ज वाटप केलेले आहे. तरलते पोटी संस्थेने विविध बँकांमध्ये 55 कोटी रुपयांची मुदत ठेवीमध्ये गुंतवणूक केलेली आहे. तसेच संस्थेचे वसूल भाग भांडवल 9 कोटी 85 लाख असून 8 कोटी 29 लाख पेक्षा जास्त रकमेचे राखीव व इतर निधी संस्थेने उभा केलेला आहे. संस्थेने सहकार कायद्याप्रमाणे कामकाज करून 1 कोटी 85 लाख रुपयाचा नफा संपादन केलेला आहे. संस्था स्थापनेपासून सतत अ वर्ग संपादन करत आहे.
शेती मित्र अशोकराव थोरात यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की मळाईदेवी पतसंस्था ही आर्थिक वर्षाच्या अखेरीस संपूर्ण व्यवहार पूर्ण करून दरवर्षाप्रमाणे वार्षिक सर्वसाधारण सभा घेते. पाणी फाउंडेशन मार्फत पाणी आडवा पाणी जिरवा यासाठी महाराष्ट्रात खूप मोठे काम होत आहे. आपल्या जखिणवाडी आगाशिव डोंगर परिसरास ऐतिहासिक वारसा आहे. त्याची आपण जपणूक केली पाहिजे. त्याच धर्तीवर त्या भागांमध्ये पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना गावातील सर्व ग्रामस्थांनी एकत्रित येऊन राबवली पाहिजे. त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढेही आपण आपल्या कुटुंबातील व मित्रपरिवार यांना आपल्या संस्थेचे सभासद होण्यास मी आवाहन करतो. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या संस्थेला अजून प्रगती पथावर नेवूया श्री. मळाई देवी नागरी सहकारी पतसंस्थेने अविरत जनसेवेची 36 वर्षे पूर्ण केलेली आहेत. संस्थेच्या जीवनातील हा टप्पा पूर्ण करत असताना आपणा सर्वांनाच विशेष आनंद होत आहे. संचालक मंडळाचा पुढील वर्षात काही शाखा मधून लॉकर सुविधा सुरू करणेचा मानस आहे. त्याचबरोबर सभासदांना बँकिंग मधील अत्याधुनिक सेवा सुविधा पुरविण्याचा मानस आहे .पतसंस्थेचे सभासदत्व खुले ठेवण्यात आलेले आहे. आर्थिक उलाढाली बरोबरच संस्था सामाजिक कार्याचेही नेहमी अग्रेसर असते. आपला भारत देश कृषीप्रधान देश असून अर्थव्यवस्थेचा तो कणा आहे. म्हणून शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी मळाई ग्रुप व मळाई ग्रुप मधील एक घटक म्हणून मळाई देवी पतसंस्थेचा विविध उपक्रमांमध्ये संस्थेच्या हिरीरीने सहभाग असतो. शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावे आयोजित करून तज्ञांचे मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, सर्वसामान्य सभासदाला वाचनाची आवड लागावी यासाठी समाज प्रबोधन सार्वजनिक वाचनालय संस्थेने पुस्तके भेट दिलेली आहेत. अशा अनेक उपक्रमातून शेतकरी कष्टकरी शेतमजूर यांची हित साधण्याचा संस्थेने प्रयत्न केलेला आहे. तसेच गेली अनेक वर्षे सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त कराड तालुक्यातील गुरुजनांचा सत्कार करून सन्मान करणे, ग्रामीण भागातील शाळेतील गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, खेळाडूंना क्रीडा साहित्यासाठी आर्थिक मदत, उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण वर्गासाठी आर्थिक मदत, प्रसंगानुसार गरजू व्यक्तींना वैद्यकीय मदत करताना तातडीची मदत असे अनेक सामाजिक उपक्रम संस्थेमार्फत राबविले जात आहेत. संस्थेकडे एकूण 67 कर्मचारी कार्यरत असून त्यामुळे तरुणांचा थोड्याफार प्रमाणात बेकारीचा प्रश्न कमी होण्यास मदत झाली आहे. सेवक वर्ग प्रशिक्षित असून त्यांना सहकार क्षेत्रामध्ये होणाऱ्या नवीन घडामोडी माहित व्हावेत म्हणून नेहमी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले जाते. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत असून सभासदांना तत्पर सेवा देण्यासाठी कोअर बँकिंग प्रणाली सेवा सुरू केलेली आहे.संस्थेच्या एकूण शाखांपैकी 16 शाखा स्वमालकीच्या इमारतीमध्ये आहेत.श्री मळाईदेवी पतसंस्था श्री मळाई देवीच्या कृपेने उत्तरोत्तर अधिक प्रगती करून समाजातील गोरगरिबांसाठी आपले कर्तव्य पार पाडील अशी खात्री आहे. या सभेत संस्थेविषयी पंजाबराव पाटील, दादासाहेब कदम, हणमंतराव कराळे, विनायक शिंदे, सुभाष पाटील, सौ.शारदा वाघ, सौ अरुणादेवी पाटील गजेंद्र पाटील, चवरे आप्पा यांनी मनोगत व्यक्त केले. सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन सौ शर्मिला श्रीखंडे व शोभा पाटील यांनी केले व संचालक श्री शामराव सखाराम पवार यांनी सर्व सभासदांचे आभार मानले.