कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आज प्रस्थान


कुंभारगाव | राजेंद्र पुजारी :
श्री क्षेत्र कुंभारगाव हे श्री वाल्मिक ऋषींच्या तप:सामर्थ्याने वै.येसुबुवा उर्फ साधू बाबा आणि वै.तातू बुवा कवर (झेंडेकरी) यांच्या वास्तव्याने पावन झालेले हे गाव.

गेल्या 17 वर्षांपासून कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळयाचे आयोजन होते. यंदा पावसाने हुलकावणी दिल्याने व शेतातील पेरणी खोळंबल्याने वारकरी, भाविक हे निसर्गावर नाराज असल्याचे चित्र दिसत आहे. तरीसुद्धा बहुसंख्येने वारकरी हे दिंडीत सहभागी झाले होते.

दिंडी चालक ह.भ.प यशवंत महाराज यांचे मार्गदर्शनाखाली कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचे आज प्रस्थान झाले. 
कुंभारगाव ते पंढरपूर दिंडी सोहळा 15 जून ते 29 जून या दरम्यान होत असून गुरुवार दि 15 जून रोजी दुपारी कुंभारगाव येथील वै. येसूबुवा उर्फ साधुबुवा आणि वै. तातुबुवा कवर (झेंडेकरी) विठ्ठल रुख्मिणी मूर्तीस अभिषेक करून टाळ, मृदंगाच्या गजरात मंदिरात भजन करण्यात आले. 

 यानंतर श्री लक्ष्मी अंबाबाई देवी व परिसरातील देव, देवतांच्या मंदिराला प्रदक्षणा करून दिंडी ज्ञानोबा तुकारामच्या गजराने ने कुंभारगाव नगर प्रदक्षणा करून सांस्कृतिक भवन येथील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात पहिला मुक्काम झाला यावेळी ह.भ.प. विठ्ठल महाराज काटेकर यांची कीर्तन सेवा पार पडली. 

शुक्रवार 16 जून सकाळी पायी दिंडी सोहळ्याच्या प्रस्थाना पूर्वी मंदिरात विठू नामाचा गजर करत व भजन म्हणत परिसर वारकऱ्यांनी दणाणून टाकला यानंतर कुंभारगाव ते पंढरपूर दिंडी सोहळ्याचे तळमावले मार्गे प्रस्थान झाले. यावेळी परिसरातील ग्रामस्थ, भाविक भक्त, महिला भगिनी,तरुण वर्ग यांनी दिंडीतील वारकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. 

दिंडी सोहळा पुढे तळमावले मार्गे दुपारी अश्विन मंगल कार्यालय कोळे, सायंकाळी मारुती बुवा मठ कराड,17 जून वाघेरी, दुपारी शामगांव, सायंकाळी राजाचे कुर्ले, 18 जून सकाळ, दुपार पुसेसावळी, सायंकाळी औंध, 19 जून वरुड, दुपार सिद्धेश्वर किरोली, सायंकाळी वडूज, 20 जून मांडवे दुपार वावरहिरे, सायंकाळी गोंदवले, 21 जून सकाळ, दुपार पिंगळी सायंकाळी शिंगणापूर, 22 जून कोथळे सकाळ, दुपार, सायंकाळी राजुरी ता.फलटण, 23 जून सकाळ, दुपार राजुरी, सायंकाळी नातेपुते, 24 जून सकाळी नातेपुते, दुपारी मांडावी, सायंकाळी माळशिरस, 25 जून माळशिरस, दुपार खुडूस, सायंकाळी वेळापूर, 26 जून वेळापूर, दुपार तोंडले, सायंकाळी भंडीशेगांव, 27 जून सकाळ भंडीशेगांव, दुपार, सायंकाळी वाखरी, 28 जून सकाळ, दुपार वाखरी, सायंकाळी पंढरपूर, 29 जून सकाळ, दुपार, सायंकाळी पंढरपूर असा कुंभारगाव ते पंढरपूर पायी दिंडी सोहळा होणार आहे.