विहे येथे क्रुझर विहिरीत कोसळली!

क्रेनच्या मदतीने गाडी बाहेर काढली मात्र गाडी मध्ये किती प्रवासी होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही. 

पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:

कराड चिपळूण रोडवर विहे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला असलेल्या विहीरीत क्रूजर गाडी कोसळल्याची घटना आज सायंकाळच्या सुमारास घडली. 

आत्ताच घटनास्थळावरून आलेल्या माहितीनुसार गाडी विहिरीच्या बाहेर काढण्यात आली आहे.

घटनेचे गांभीर्य ओळखून मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उत्तम भापकर यांच्यासह पोलीस कर्मचारी, प्रांताधिकारी सुनिल गाढे, तलाठी, पोलीस पाटील, सरपंच तसेच प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.

 विहिरीतून क्रुझर गाडी काढण्यात त्याना यश आले असले तरी गाडीत किती प्रवासी होते हे अद्याप स्पष्ट झाले नाही.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, पाटण तालुक्यातील विहे गावच्या हद्दीत रस्त्याकडेला कुंभारकी नावाची विहीर आहे. मंगळवारी सायंकाळच्या सुमारास क्रूझर चालक मल्हारपेठहून कराडच्या दिशेने येत होता. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास विहे गावच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा क्रूझरवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याकडेला असलेल्या विहीरीत सुमारे 25 ते 30 फूट खोल पाण्यात बुडाली. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ, पोलीस पाटील यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.