“संजय राऊत माझ्या मतदारसंघातून लढून दाखवा” मंत्री शंभूराज देसाईंचे राऊतांना चॅलेंज


पाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा:
लांबून गप्पा मारणाऱ्या राऊतांनी माझ्या मतदारसंघात येवून रहावे आणि माझ्याविरोधात उभे राहून दाखवावे, त्यांच्या जेवण खाण्याची सगळी व्यवस्था मी करतो. 
माझ्या मतदारसंघातील सामान्य जनता त्यांना दूध का दूध पानी का पानी करून दाखवतील, अशी खोचक टीका साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी खासदार संजय राऊत  यांच्यावर केली. गद्दारांचा भूकंपाचा केंद्रबिंदू पाटण असेल या खासदार राऊत यांच्या वक्तव्याचा मंत्री देसाईंनी समाचार घेतला.

आम्‍ही आमची पातळी सोडणार नाही
बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब देसाई यांचे संबंध अत्यंत सलोख्याचे होते. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारापासून कधीही बाजूला गेलो नाही. गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारताना स्वर्गीय बाळासाहेब देसाई यांना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांची मदत झाली होती. याची जाणीव आमच्या परिवाराला आहे. राऊत हे एका वर्तमानपत्राचे संपादक आहेत. त्यांनी खालची पातळी सोडली तरी आम्ही आमची पातळी सोडणार नाही; असे मत मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले.

एकत्र असताना आम्ही वाघाचे बछडे
अडीच वर्षांपूर्वी आम्ही देखील राऊत यांच्या सोबत होतो. एकत्र काम करायचे, त्यावेळी ते म्हणायचे हे आमचे शिवसैनिक आहेत. वाघाचे बछडे आहेत. राऊत यांच्या सांगण्यावरून पक्षात काही उलटे निर्णय झाले, जे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराशी निगडित नव्हते.