पाटण येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होणार

विविध सामाजिक उपक्रम राबवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन साजरा करावा: राजाभाऊ शेलारपाटण | कृष्णाकाठ वृत्तसेवा: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्या १० जून रोजी आपल्या रौप्य महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे. पक्षाचा हा रौप्य महोत्सवी वर्धापन दिन पाटण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने उद्या शनिवार दि. १० जून रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता पाटण येथील पक्ष कार्यालयामध्ये पाटण विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे नेते व सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सत्यजितसिंह पाटणकर यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार आहे. पक्षाचा हा वर्धापन दिन रुग्णांना फळे व बिस्किटे वाटप करुन साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली. त्याचबरोबर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वांना एकत्र घेऊन, गावोगावी नियोजनबद्ध पद्धतीने पक्षाचा हा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करावा असेही शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. पक्षाने नेहमीच विविध उपक्रम आणि धोरणांमधून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे या वर्धापन दिनानिमित्तदेखील तालुका तसेच गावपातळीवर विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे. या आवाहनास प्रतिसाद देऊन ते पूर्णत्वास घेऊन जाण्याची जबाबदारी पक्षातील प्रत्येकाची आहे असं त्यांनी सांगितले. पक्षाचा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी सर्व सेलचे पदाधिकारी, आजी/माजी जि.प. व प.स. सदस्य, सर्व संस्थाचे आजी/माजी चेअरमन, व्हॉ.चेअरमन, संचालक, आजी/माजी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, सर्व आजी/माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य व कार्यकर्त्यांनी वेळेत उपस्थित रहावे असे आवाहनही त्यांनी पत्रकात शेवटी केले आहे.