सांगलीत 'रिलायन्स ज्वेलर्स'वर भरदिवसा सशस्त्र दरोडा; गोळीबार करत अख्खे दुकान लुटले.


सांगली| कृष्णाकाठ वृत्तसेवा :
सांगलीतील रिलायन्स ज्वेलर्सवर आज दि.3 जून रविवारी दुपारी भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला. गोळीबार करत अख्खे दुकान लुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. सांगली -मिरज रस्त्यावर रिलायन्स ज्वेलर्सचे दुकान आहे. सांगली- मिरज रस्त्यावर एक झाड रविवार दुपारी तोडण्यात येत होते. त्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. त्याचा फायदा घेत सहा ते सात जणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने दरोडा टाकला. यावेळी दुकानातील सर्व सोने आणि हिरे लुटून नेण्यात आले. यावेळी दरोडेखोरांनी गोळीबार देखील केल्याचे घटनास्थळवरून समजते. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. परंतु, दुकानाबाहेर श्वान घुटमळले. दरोडेखोरांच्या मागावर स्थानिक गुन्हे अन्वेषणची पथके रवाना करण्यात आली आहेत.